रसुलाबाद ते कवठा रस्त्याला उदासीनतेचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:20 AM2017-12-29T00:20:14+5:302017-12-29T00:20:59+5:30
कवठा (रेल्वे) ते रसुलाबाद या तीन किमी रस्त्याला प्रशासकीय उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. कित्येक वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांना अधिक अंतराचा फेरा करावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
रसुलाबाद : कवठा (रेल्वे) ते रसुलाबाद या तीन किमी रस्त्याला प्रशासकीय उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. कित्येक वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांना अधिक अंतराचा फेरा करावा लागतो. याकडे लक्ष देत रस्त्याचे त्वरित बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मागील ३० वर्षांपासून ग्रामस्थ रसुलाबाद ते कवठा (रेल्वे) या तीन किमी रस्त्याच्या डांबरीकरण तथा नाला दुरूस्तीची मागणी करीत आहेत. अनेक आमदार, खासदार झाले; पण कुणीही याकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी, नागरिकांना खड्डेमय रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. रस्त्याची गिट्टी पूर्णत: उखडली असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गावाशेजारी दहा फुट खोली असलेल्या या रस्त्यावर नाला आहे. मागील वर्षी या नाल्यावर सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात या नाल्यात अडीच फुटांपर्यंत पाणी असते. रस्त्यावरील गिट्टी, खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. पादचाऱ्यांनाही ठेचाळत मार्गक्रमण करावे लागते. हा रस्ता टाळायला झाल्यास पुलगावला फेरा मारून जावे लागते. वर्धा, देवळी, मलकापूर, केळापूर, दहेगाव आदी ठिकाणी जाणारे नागरिक पुलगाव येथून जातील; पण या रस्त्यावर शेती असलेल्या नागरिकांना मात्र नाईला म्हणून खड्ड्यांतून मार्ग काढतच ये-जा करावी लागत आहे.
खड्डेमय रस्त्याने एकदा नागरिक ये-जा करतीलही; पण शेतात साहित्याची ने-आण करणे, शेतमाल घरी नेणे आदी कामे करताना कसरत करावी लागते. दहा फुट खोल नाल्यातून बंडी ओढावी लागत असल्याने बैलांचेही हाल होतात. रेल्वेसाठी कवठा मार्ग जवळचा असल्याने अनेक गावांतील नागरिक या मार्गाचा अवलंब करतात. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली. ग्रामसभेत ठराव घेतले; पण कुठलीही कार्यवाही झाली नाही. याकडे लक्ष देत रस्ता तथा पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.