प्रशिक्षणाविना साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:00 AM2019-09-17T01:00:54+5:302019-09-17T01:01:58+5:30
अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य गोष्टदेखील शक्य करता येते, याचा प्रत्यय पढेगाव येथे कुणाल इंद्रपाल टेकाम याने हस्तकलेतून साकारलेल्या पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तीतून येतो. दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेला कुणाल रोजमजुरी करीत असून फावल्या वेळेत भावविश्वातून श्रीगणेशाची मूर्ती साकारण्यास सुरुवात केली. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत मस्कऱ्या गणपतीची मूर्ती तयार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य गोष्टदेखील शक्य करता येते, याचा प्रत्यय पढेगाव येथे कुणाल इंद्रपाल टेकाम याने हस्तकलेतून साकारलेल्या पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तीतून येतो.
दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेला कुणाल रोजमजुरी करीत असून फावल्या वेळेत भावविश्वातून श्रीगणेशाची मूर्ती साकारण्यास सुरुवात केली. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत मस्कऱ्या गणपतीची मूर्ती तयार केली. ही मूर्ती ६ फूट उंच ४ फूट रुंद आहे. विशेष म्हणजे, कुणालने ही मूर्ती साकारण्यास कुठलेही प्रशिक्षण घेतले नाही. त्याला बालपणापासूनच मातीपासून विविध वस्तू तयार करण्याचा छंद होता. १०-१२ वर्षांचा असतानाच पोळ्याच्या सणाला पूजनाकरीता मातीचे वाट बैल तयार केले होते.
नंतर कोजागरी पोर्णिमेला भुलाबाई तयार केल्यात. हा छंंद जोपासत असतानाच त्याने विविध वस्तू साकारल्यात. गणपती, नंदी बैल, वेगवेगळ्या प्राण्यांच्या मूर्ती हुबेहुब साकारल्या. यावेळी त्याने प्रथम श्रीगणेशाची मूर्ती साकारली. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर असून आता त्याला देवीच्या मूर्ती बनविण्याचीही आर्डर मिळत आहेत. हल्ली कुणाल रोजमजुरी करून कुटुंबाला हातभार लावतो. दिवसभर शेतात काम केल्यानंतर रात्रीच्या वेळेस मूर्तीस आकार देतो.
पुढल्या वर्षीपासून पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती गणेश चतुर्थीला तयार करून बाजारपेठेत विक्रीस सज्ज राहील. देवीच्या मूर्तीही तयार करण्यात येत आहेत. कलेची जोपासना करण्यातून आगळावेगळा आनंद मिळत आहे.
- कुणाल इंद्रपाल टेकाम, पढेगाव.