सफाई कामगारांचे आर्थिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:38 PM2018-03-04T23:38:27+5:302018-03-04T23:38:27+5:30
मध्य रेल्वेच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या सफाईचा तीन वर्षांचा ठेका सातारा जिल्ह्यातील प्रमोद पाटील यांना मिळाला. या अॅग्रीमेंटप्रमाणे १७ सफाई कामगार येथे नियुक्त केले.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : मध्य रेल्वेच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या सफाईचा तीन वर्षांचा ठेका सातारा जिल्ह्यातील प्रमोद पाटील यांना मिळाला. या अॅग्रीमेंटप्रमाणे १७ सफाई कामगार येथे नियुक्त केले. मात्र या ठेकेदाराकडून कर्मचाºयांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप सिटूने आ. डॉ. पंकज भोयर यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
मध्य रेल्वेशी झालेल्या कराराप्रमाणे सर्व सफाई कामगारांना ३६० रुपये प्रती दिन वेतन देणे बंधनकारक आहे. येथे मात्र १८३ रुपये रोज सफाई कामगारांना दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वेतन कमी मिळत असल्याने कामगारांनी डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर नागपूर यांना तक्रार केली. १ फेब्रुवारी २०१८ रोजी डी.आर.एम.मध्य रेल्वे नागपूर येथे कामगार, कंत्राटदार, रेल्वे अधिकारी यांच्यात नागपूर येथे चर्चा होऊन वेतन ३६० रुपये प्रती दिन देण्याचा निर्णय झाला. मात्र कंत्राटदाराने वेतन वाढवून मागणाºया १२ सफाई कामगारांना १८३ रुपये रोजाने काम करा अन्यथा कामावरुन बंद असा सज्जड दम देऊन कामावरुन कमी केले.
एवढेच नव्हे तर कामगारांना ओळखपत्र देण्याच्या नावाखाली दिवाळीत आधार कार्डाची झेरॉक्स प्रत सही करुन घेतली. या आधारकार्डाचा कंत्राटदाराने दुरुपयोग करुन इक्वीटास स्मॉल सेव्हींग बँक, कराड, जि. सातारा येथे कामगारांचे सेव्हींग बँक अकाऊंट काढले. त्या खात्यावर पासबुक, ए.टी.एम. कार्ड, चेकबुक कामगारांचे नावे उचलून त्याचा वापर कंत्राटदार करीत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. सदर खात्यात कामगारांचे दोन महिन्याचे वेतन २६ हजार ३२२ रुपये कंत्राटदाराने जमा केले व दुसºयाच दिवशी ते काढूनही घेतले.
१९ फेब्रुवारी २०१८ रोजी कंत्राटदार वर्धा येथे आला असताना त्याला कामगारांनी थकीत वेतन मागितले असता, तुमचे वेतन झाले, तुम्ही पैसे उचलले देखील आहे. असे सांगून बँकेचे अकाउंटची यादी दिली. सदर यादी घेऊन वर्धा येथील ईक्विटास बँकेचे धंतोली चौकातील शाखेत जाऊन कामगारांनी बँक पासबुकाची प्रत काढली तेव्हा हा गैरप्रकार उघड झाला.
सेवाग्राम रेल्वे स्थानकात सफाईकरिता असलेल्या सर्व मशिन्स बंद अवस्थेत आहेत. डस्टबीन लावले नाही, अॅग्रीमेंटप्रमाणे व्यवस्था नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
अशाप्रकारे सफाई कामगारांना कामाचे वेतनही मिळाले नाही व वेतन मागितले असता कामावरुन बंद केले व फसवणूक केली. या घटनेची तक्रार प्रत्यक्ष भेटून नागपूर येथील मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांना केली असून खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर यांना स्वत: भेटून कामगारांनी केली आहे.
कामगारांना थकीत वेतन देऊन पूर्ववत कामावर घ्यावे, त्यांना नियमाप्रमाणे ३६० रुपये प्रती दिन वेतन, प्रॉव्हीडंट फंड कपात, हजेरी कार्ड, हॅन्ड ग्लोज, गमबुट, राष्ट्रीयकृत बँकेद्वारा वेतन, दिवाळी बोनस १० तारखेपर्यंत दरमहा वेतन मिळावे, अपघात विमा काढावा, बेकायदेशिरपणे कमी केलेल्या सर्व १२ कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स चे सिताराम लोहकरे, यशवंत झाडे, भैय्या देशकर, सुनील घिमे यांनी निवेदनातून केली असून कार्यवाहीची मागणी केली आहे.