‘शिक्षण’ राष्ट्र निर्माण व नागरिकांना संघटित करते
By admin | Published: November 13, 2016 12:44 AM2016-11-13T00:44:35+5:302016-11-13T00:44:35+5:30
नई तालीम शिक्षण प्रणाली जीवनाशी संबंधीत आणि जीवन घडविण्याची शिक्षण पद्धती आहे.
सुगन बरंठ : नई तालीम परिसरात राष्ट्रीय परिसंवाद
सेवाग्राम : नई तालीम शिक्षण प्रणाली जीवनाशी संबंधीत आणि जीवन घडविण्याची शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे ती जीवनाच्या शेवटपर्यंतची चालणारी प्रक्रिया आहे. समताधिष्टीत समाज कसा बनेल आणि आपले कर्तव्य पूर्ती करण्याची भावना अधिक प्रभावी बनावी या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिक्षण फक्त शाळा व महाविद्यालयातच नाही तर समाज दृष्टीकोणातूनही मिळते. शिक्षण हे राष्ट्र निर्माण व नागरिकांना संघटीत करण्याचे काम करते, असे प्रतिपादन नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी केले.
नई तालीम समिती परिसरातील शांती भवन येथे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी मंत्री प्रदीपदास गुप्ता, आनंद निकेतनच्या संचालिका सुषमा शर्मा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी डॉ. बरंठ यांनी नई तालीम शिक्षण प्रणालीचे महत्व व आवश्यकता यावर मत मांडले.
मंत्री प्रदीपदास गुप्ता यांनी नई तालीमला देशभऱ्यात पसरविण्याची गरज आहे. त्याची सार्थकता वर्तमान परिस्थिती आणि शिक्षणातून सिद्ध होणार असल्याचे सांगितले.
सुषमा शर्मा व सहकाऱ्यांनी दहा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रा. सीमा पुसदकर, प्रा. किरण धांदे, प्रा. उर्मिला हाडेकर इत्यादींनी सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी यांच्या समन्वयातून जि.प.च्या शाळेत गुणवत्तापूर्व शिक्षण कसे दिले जाते. व त्याचे परिणाम किती सकारात्मक आहेत, यावर मत मांडले. तर प्रा. प्रभाकर पुसदकर यांनी गुणवत्ता पूर्ण सार्थक शिक्षण अभियानांतर्गत झालेल्या कार्याचा आढावा सादर केला.
यावेळी न.पा. शिक्षण प्रणाली कसी राबविता येईल यावर विचार विनीमय करण्यात आले. न.पा.चे शिल्पकार मॉ. बाबा यांची मुलगी मितूट परिसंवादात सहभागी झाल्या. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उडीसा, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील ६० प्रतिनिधी या परिसंवादात सहभागी झाले आहे. संचालन प्रा. प्रदीप दासगुप्ता व प्रा. प्रभाकर पुसदकर यांनी केले. या परिसंवादात शिक्षण विभागातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.(वार्ताहर)