शिक्षण विभागाच्या डुलक्या; दांडीबहाद्दरांचे फावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 10:01 PM2019-02-07T22:01:36+5:302019-02-07T22:02:46+5:30

बारावी विज्ञान शाखेच्या दांडीबहाद्दराना आळा घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक्स हजेरी सुरु केली. पण जिल्ह्यातील बहुतांश खासगी कनिष्ठ महाविद्यालयाने या प्रणालीला हरताळ फासला आहे.

Education Department nods; False rugs | शिक्षण विभागाच्या डुलक्या; दांडीबहाद्दरांचे फावते

शिक्षण विभागाच्या डुलक्या; दांडीबहाद्दरांचे फावते

Next
ठळक मुद्देबायोमेट्रिक्सची चौकशी समिती कागदोपत्रीच : बारावीच्या मौखिक परीक्षेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बारावी विज्ञान शाखेच्या दांडीबहाद्दराना आळा घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक्स हजेरी सुरु केली. पण जिल्ह्यातील बहुतांश खासगी कनिष्ठ महाविद्यालयाने या प्रणालीला हरताळ फासला आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या माध्यमिक शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे दांडी बहाद्दरांचे चांगलेच फावते आहे. परिणामी वर्षभर महाविद्यालयात उपस्थित नसलेले विद्यार्थीही आता मौखिक परीक्षा देत असून येत्या दिवसात अंतिम परीक्षेलाही ते समोरे जाणार आहे. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला शिक्षण विभागाकडूनच मुठमाती मिळत आहे.
विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेणारे विद्यार्थी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून किंवा स्वत: कनिष्ठ महाविद्यालयात नाममात्र प्रवेश घेऊन दोन वर्ष महाविद्यालयाला दांडी मारतात. केवळ मौखिक, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेलाच ते उपस्थित होतात. विशेषत: ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय परीक्षेला बसता येत नाही. असा बोर्डाचा नियम आहे. हा नियम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वअर्थसाहाय्य कनिष्ठ महाविद्यालयाला लागू होतो. असे असतानाही काही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय सोडले तर इतरांनी नाममात्र प्रवेश नोंदवून बोगस विद्यार्थ्यांच्या भरोशावर आपली दुकानदारी चालविली आहे. यालाच आळा घालण्याकरिता शासनाने बायोमेट्रिक्स हजेरी यावर्षीपासून सुरु केली. त्यानुसार जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी बायोमॅट्रीक्स लावली पण, अंमलबजावनीकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण विभागाकडूनच कोणताही पाठपुरावा केल्या जात नसल्याने बायोमेट्रिक्स हजेरी नंतरही काही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय वगळता इतर महाविद्यालयात वर्षभर दांडी मारणारे विद्यार्थी आता मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षेकरिता अवतरले आहे. याकरिताही संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी उत्तम मॅनेजमेंट केल्याने महाविद्यालयांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहत आहे.

या महाविद्यालयांचा बायोमेट्रिक्सला ठेंगा
जिल्ह्यातील आठही तालुक्यात अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वअर्थसाहाय्य असे ६० कनिष्ठ महाविद्यालयाल आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार त्यातील ५४ महाविद्यालयांनी बायोमेट्रिक्स प्रणाली लावली आहे. पण सहा कनिष्ठ महाविद्यालयाने याकडे पाठ फिरविल्याने शासनाच्या आदेशाची अवहेलना केल्याचे दिसून येते. यामध्ये जिल्हा परिषद महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय वर्धा, स्व.के.जी.वाघ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रोहणा, संत गजाननप्रसाद कनिष्ठ महाविद्याल गिरड, जे.डी.कनिष्ठ महाविद्यालय वासी, संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर, व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालय येळाकेळी इत्यादी कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.

आदेशाची अंमलबजावनी नाही
विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक्स हजेरीप्रणालीबाबत लोकमते वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नावरुन जिल्हा परिषद अध्यक्षांनी बायोमेट्रिक्स हजेरीच्या अंमलबजावणी संदर्भात ठराव घेत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. पण ही समिती कागदोपत्रीच असल्याने खासगी कनिष्ठ महाविद्यालयांची मनमर्जी सुरुच आहे. सभागृहाच्या आदेशानंतरही समितीने दखल घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे वर्षभर गायब असलेले विद्यार्थीही आता मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षा देत असल्याने आता तरी या समितीने महाविद्यालयात जाऊन चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात विज्ञान शाखेचे ६० कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यातील ५४ महाविद्यालयांनी बायोमॅट्रीक्स प्रणाली लावली आहे. तर ६ महाविद्यालयांनी अद्यापही बायोमॅट्रीक्स लावलेली नाही. त्यामुळे या ६ महाविद्यालयाचा अहवाल उपसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल.
अजय गुल्हाणे, मुख्य कार्यपालन अधिकारी

Web Title: Education Department nods; False rugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.