शिक्षणाधिकारी माध्यमिक व पालकांत शाब्दिक चकमक
By admin | Published: January 3, 2017 01:11 AM2017-01-03T01:11:22+5:302017-01-03T01:11:22+5:30
स्थानिक जनता हायस्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांवर केलेल्या दंडात्मक कारवाईच्या विरोधात खा. रामदास तडस
रामदास तडस यांची उपस्थिती : जनता हायस्कूलच्या दंडात्मक कारवाईचा वाद
देवळी : स्थानिक जनता हायस्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांवर केलेल्या दंडात्मक कारवाईच्या विरोधात खा. रामदास तडस यांच्या कार्यालयात सोमवारी आयोजित पालक सभेत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एल.एम. डुरे व पालकांत चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. यामुळे प्रकरण चिघळण्यापर्यंत आले. शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या कापसे यांच्या विरोधात पालकांनी याप्रसंगी विचित्र व्यवस्थापनाचा पाढाच वाचला.
जनता हायस्कूलच्या मुुख्याध्यापिका कापसे यांनी शाळेतील ५० विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करून दोन दिवसापर्यंत वर्गाबाहेर ठेवले. पाच दिवसांपर्यंत वर्गात न बसण्याची तंबी देत प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड केल्याचा आरोप होता.
मुख्याध्यापिकेच्या दडपशाहीने विद्यार्थ्यांचे नुकसान- पालकांचा आरोप
४शाळेतील पाचव्या वर्गातील विद्यार्थिनीने दोन महिन्यांपर्यंत शाळेच्या हजेरी पटावर घेतले नसल्याने व सेमी इंग्रजीमध्ये प्रवेश नाकारल्याने विष प्राशन केले. सावंगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देवून ती बचावली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या बाराव्या वर्गातील विद्यार्थिनीला बोर्डाच्या परीक्षेतून हाकलून लावले. त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांजवळ सिगारेट आढळली म्हणून त्याच्यावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. पालकांच्या अनेक विनवण्यानंतर दोन हजार रुपयात प्रकरण निपटल्याचे पालकांनी खासदार व शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जनता हायस्कूलमधील दडपशाहीचे प्रकार नेहमीचेच झाले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसोबतच पालकांना कोंडीत पकडले जात आहे. यापुढे या शाळेतील कोणताही अनुचित प्रकार सहन केला जाणार नाही.
- खा. रामदास तडस
शाळेतील सर्व प्रकाराची येत्या तीन दिवसात चौकशी करून याबाबतचा अहवाल संस्थेला देण्यात येईल. तसेच कारवाई करण्याचे सांगण्यात येईल. संस्थेने कारवाई न केल्यास शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार देण्यात येईल.
- एल.एम. डुरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), वर्धा.