शिक्षण; गरिबीचे दुष्टचक्र भेदण्याचा उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:20 AM2019-02-11T00:20:00+5:302019-02-11T00:22:48+5:30
महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे सामर्थ्य ओळखून सर्वांना समान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला होता. संविधानानुसार शिक्षण विशेषत: उच्च शिक्षण हा आमचा हक्क आहे व तो देणे सरकारचे दायित्व आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे सामर्थ्य ओळखून सर्वांना समान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला होता. संविधानानुसार शिक्षण विशेषत: उच्च शिक्षण हा आमचा हक्क आहे व तो देणे सरकारचे दायित्व आहे. असे असतानादेखील बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. शिक्षण हाच गरिबीचे दुष्टचक्र भेदण्याचा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन संविधान अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार यांनी केले.
घांगळे सभागृहात प्रजासत्ताक शिक्षण कर्मचारी संघातर्फे आयोजित सातव्या राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.श्रीरंग मेंढे होते. मीरा इंगोले, अरूणकुमार हर्षबोधी, वामन सोमकुवर प्रामुख्याने उपस्थित होते.
संविधानातील शिक्षण व आजची आव्हाने या विषयावर बोलताना प्रा.घोडेस्वार म्हणाले, शिक्षणाला खासगीकरणाच्या विळख्यात ढकलून १३ पॉइंट आरक्षणासारखे निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे शिक्षण म्हणजे नोकरीसाठी अर्ज करण्याची पात्रता, पण नोकरी मिळणार नाही, अशी प्रस्थापित व्यवस्था परिवर्तनासाठी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रा.श्रीरंग मेंढे यांनी शिक्षणाच्या वर्तमान व्यवस्थेवर टीका केली. सचिन धोंगडे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. प्रास्ताविक अरविंद माणिककुळे यांनी केले. विषयाची भूमिका डॉ. राजू कांबळे यांनी मांडली. संचालन सावित्रीबाई नाखले यांनी तर आभार भाग्यश्री भगत यांनी मानले. आयोजनासाठी प्रकाश कांबळे, किशोर ढाले, सत्येंद्र गोटे, मनोहर लांडगे, परमा तायडे, मिलिंद नगराळे, विजय भालेराव इत्यादींनी सहकार्य केले.