शिक्षण प्रणालीत बदल आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:45 AM2018-11-17T00:45:30+5:302018-11-17T00:45:56+5:30
पर्यावरणाची कुठलीही हाणी न होऊ देता घराचे बांधकाम होणे ही काळाची गरज आहे. आपण स्वत: अभियंता असून शिक्षण घेताना आम्हालाही सिमेंट काँक्रीट आदी विषयी माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पर्यावरणाची कुठलीही हाणी न होऊ देता घराचे बांधकाम होणे ही काळाची गरज आहे. आपण स्वत: अभियंता असून शिक्षण घेताना आम्हालाही सिमेंट काँक्रीट आदी विषयी माहिती देण्यात आली. परंतु, सध्या काळाची व निसर्गाचा होणारा ऱ्हास लक्षात घेवून या शिक्षण प्रणालीत बदल होणे गरजेचे आहे. भारत आणि इंडिया यात मोठा फरक असून भारतात निसर्गपूरक शिक्षण व्यवस्था आवश्यक आहे. पक्के सिमेंट काँक्रीटची मकान आकर्षक दिसत असली तरी तीन भुकंप व भविष्यातील १५ ते २० वर्षानंतर घातक आहेत, असे प्रतिपादन गाढे अभ्यासक राजेंद्र देसाई यांनी केले.
स्थानिक जे. बी. विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात जमनालाल बजाज पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा विविध विषयांवर विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर शिक्षा मंडळाचे संजय भार्गव, प्रसन्ना भंडारी, डॉ. क्लेबर कारसन, रुपल देसाई, धुमसिंग नेगी आदींची उपस्थिती होती.
धुमसिंग नेगी यांनी शेतकरी परिवारातून आपण आहे. खासगी शाळेसाठी प्रयत्न झाल्यानंतर आपण त्याच शाळेत दहा वर्ष सेवा दिली. शिवाय विविध प्रयोग केले. त्याच वेळी वृक्ष कत्तल विरोधी हुंकार भरला जात होता. सर्वोदय कार्यकर्त्यांनी अहिंसक पद्धतीने वृक्ष वाचविण्यासाठी लढा दिला. त्यावेळी झाडांना आंदोलनकर्त्यांनी भाऊ अशी संबोधत त्याच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक वृक्ष जगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शेती विषयी बोलताना नेगी म्हणाले, सध्या शेती विषारी झाली आहे. विषमुक्त शेती होणे गरजेचे आहे. बीज बचाव आंदोलनासह शेती बचाव आंदोलन उभे होत आहे. विद्युत निर्मितीसाठी होणारे मोठाले बांध न बांधता छोटे-छोटे बांध बांधल्यास त्याचे दुष्परिणाम कमी होतील. इतकेच नव्हे तर जंगल आणि जमिनीचे नुकसान जास्त होणार नाही. तसे पाहिजे तर छोटे बांधही काही प्रमाणात नुकसानदायक ठरणारेच असल्याचे यावेळी नेगी यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला वर्धेतील गणमान्य व्यक्तींसह वर्धेकरांची उपस्थिती होती. याप्रसंगी छोट्या चित्रफितद्वारे विविध विषयांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.