शिक्षण व्यवस्था मुलांचे खच्चीकरण करणारी; डॉ. अभय बंग यांचे शैक्षणिक धोरणावर आसूड
By अभिनय खोपडे | Published: February 5, 2023 02:45 PM2023-02-05T14:45:10+5:302023-02-05T14:45:28+5:30
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी डॉ. बंग यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य हिरो होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (वर्धा) : वर्षाला २.५० कोटी मुलं जन्माला येतात. १५ ते २० कोटी लोकं सध्या शिक्षणाच्या बाजारात गुंतलेली आहेत. पालकांनीही मुलांना रेसकोर्सचे घोडे बनविले आहे. निर्बुद्ध जीवन तयार करणारी सध्याची शिक्षण प्रणाली मुलांचे खच्चीकरण करीत आहे. नयी तालीम शिक्षण प्रणालीतून जीवनासाठी शिक्षण देण्याची व्यवस्था होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले.
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी डॉ. बंग यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य हिरो होते. परंतु, मराठी साहित्यकारांनी या लढ्याची सुरुवातीला उपेक्षा केली. नंतर विरोध केला. मराठीत यावर महाकादंबरी निघाली असती. परंतु विशेषत: एका विशिष्ट समाजाच्या साहित्यकारांनी यावर साहित्य निर्मिती केली नाही. गांधी गैरमराठी असल्यामुळे हे घडले असावे, असेही ते म्हणाले.
विनोबांच्या अनुशासन पर्वावर केला खळबळजनक खुलासा -
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ ला देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी विनोबा भावे पवनार आश्रमात मौन व्रत धारण करून होते. त्यांना भेटण्यासाठी तत्कालीन काँग्रेस नेते दिवंगत वसंत साठे गेले होते. त्यांनी आणीबाणी पर्वाची माहिती कागदावर विनोबांना लिहून दिली. त्यावर विनोबांनी अनुशासन पर्व यावर प्रश्नचिन्ह टाकले होते. मात्र, वसंत साठेंनी नागपुरात जाऊन आणीबाणीला विनोबांनी अनुशासन पर्व म्हटल्याचे सांगितले आणि ध चा मा केला, असा दावा डॉ. बंग यांनी या मुलाखतीत केला.