वर्धेत ईएसआयसी कार्यालयासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:39 PM2018-07-06T23:39:05+5:302018-07-06T23:40:01+5:30
राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. १४ ईस्पितळे व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. राज्यात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू असून यात वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे; .......
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. १४ ईस्पितळे व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. राज्यात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू असून यात वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे; पण वर्धा जिल्ह्यात कार्यालय व दवाखाना नसल्यामुळे जिल्ह्यातील कामगारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. सदर कार्यालय व दवाखाना वर्धेत व्हावा यासाठी आ. पंकज भोयर व आपण स्वत: प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
भारतीय जनता कामगार महासंघ व लॉयडस् ईस्पात मजदूर संघाच्यावतीने आयोजित कामगार मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर आ. डॉ. पंकज भोयर, जि. प. सदस्य पंकज सायंकार, कामगार नेते मिलिंद देशपांडे, राजहंस राऊत, कर्मचारी विमा योजनेचे मनोज यादव, डॉ. एस. आर. हसन आदींची उपस्थीत होती. खा. तडस पुढे म्हणाले, जिल्ह्यात ३,५०० कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ई. एस. आय. सी. च्या सुविधा मिळण्यास अडचण जाऊ नये याकरिता वर्धेत कार्यालय व दवाखाना सुरु करण्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर व आपण स्वत: सरकारकडे पाठपुरावा करु. ई. एस. आय. सी. संदर्भात उद्धभवणाऱ्या अडचणीबाबत लवकरच बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. आ. डॉ. पंकज भोयर यांनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र सरकारकडे वर्धेत कार्यालय सुरु करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. शिवाय कामगार मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर अधिवेशात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी मनोज यादव, जि.प.सदस्य पंकज सायंकार, राजहंस राऊत यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मिलिंद देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अभय नागरे यांनी केले.