दारूबंदीची होतेय प्रभावी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:48 PM2018-08-22T23:48:18+5:302018-08-22T23:49:12+5:30
येत्या काही दिवसांवर असलेल्या विविध सणांदरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, या हेतूने पोलिसांनी दारूविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांकडून दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून मोठ्या प्रमाणात गावठी, देशी व विदेशी दारूसाठ्यासह इतर साहित्य जप्त करून दारूविक्रेत्यांना अटक करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येत्या काही दिवसांवर असलेल्या विविध सणांदरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, या हेतूने पोलिसांनी दारूविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांकडूनदारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून मोठ्या प्रमाणात गावठी, देशी व विदेशी दारूसाठ्यासह इतर साहित्य जप्त करून दारूविक्रेत्यांना अटक करण्यात येत आहे. यामुळे विक्रेत्यांची धाबे दणाणले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या खांद्यावर दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी आहे. परंतु, राज्य उत्पादन शुल्क विभाग अल्प मनुष्यबळामुळे प्रभावी ठरत नाही. त्यामुळे अवैध दारूविक्रीला आळा घालताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे वास्तव आहे.
२६ गावठी दारूभट्ट्या केल्या उद्ध्वस्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सेलू ठाण्यांतर्गत येत असलेल्या हिंगणी, शिवणगाव, धामणगाव आदी ठिकाणी छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. याप्रसंगी पोलिसांनी सुमारे २६ गावठी दारूभट्ट्या उद्धवस्त करून दारूसाठ्यासह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण ५ लाख १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार प्रमोद जांभुळकर, सलाम कुरेशी, स्वप्नील भारद्वाज, कुणाल हिवसे, हितेंद्र परतेकी, जगदीश डफ, यशवंत गोल्हर, संघसेन कांबळे, विकास अवचट, प्रदीप वाघ, रितेश शर्मा आदींनी केली
दारूसाठ्यासह कार व दुचाकी पकडली
हिंगणघाट : येथील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे नाकेबंदी करून कार व दुचाकीसह मोठ्या प्रमाणात दारूसाठा असा एकूण २ लाख ८७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रूबा चौक हिंगणघाट येथे नाकेबंदी करून कारची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय शैलेश केशव येडे (२५) व प्रफुल आंबटकर दोन्ही रा. बेला ता. उमरेड जि. नागपूर यांच्याविरुद्ध दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले होते. तर कलोडे चौक व रिमडोह शिवारात करण्यात आलेल्या कारवाईत दोन दुचाकी व देशी दारूसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी शुभम मनोहर शेंद्रे (२१) रा. शिवाजी वॉर्ड हिंगणघाट, अक्षय बिंनदुसार बाणमारे(२१) रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात हमीद शेख, शेखर डोंगरे, रामकिसन ईप्पर, सचिन भारशंकर, भेडे यांनी केली.