पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनासाठी आठ हौद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:41 PM2018-09-19T21:41:01+5:302018-09-19T21:41:25+5:30
संभाव्य जलप्रदुषणाला आळा घालता यावा तसेच गणेश भक्तांना सुविधा मिळावी या उद्देशाने गत वर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर वर्धा न.प. प्रशासनाने यंदाच्या वर्षी पर्यावरणपूरक गणेश मुर्ती विसर्जनासाठी कंबर कसली आहे. न.प.च्यावतीने २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत शहरातील विविध आठ ठिकाणी कृत्रिम हौद ठेवण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संभाव्य जलप्रदुषणाला आळा घालता यावा तसेच गणेश भक्तांना सुविधा मिळावी या उद्देशाने गत वर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर वर्धा न.प. प्रशासनाने यंदाच्या वर्षी पर्यावरणपूरक गणेश मुर्ती विसर्जनासाठी कंबर कसली आहे. न.प.च्यावतीने २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत शहरातील विविध आठ ठिकाणी कृत्रिम हौद ठेवण्यात येणार आहेत.
गणेश मुर्ती विसर्जन दरम्यान होणाऱ्या जलप्रदुषणाला आळा घालण्यासाठी सुमारे मागील तीन वर्षांपासून वर्धा न.प.च्यावतीने पर्यावरणपूरक गणेश मुर्ती विसर्जन उपक्रम हाती घेवून ठिकठिकाणी कृत्रिम हौद ठेवण्यात येत आहे. गत वर्षी न.प.च्या या उपक्रमाला वर्धेकरांची चांगला प्रतिसाद दिला होता. त्याच पाश्वभूमिवर यंदाही वर्धा न. प. प्रशासनाने आठ ठिकाणी कृत्रिम हौद ठेवण्याचे निश्चित केले आहे. या आठही ठिकाणी निर्माल्यही गोळा केले जाणार आहे. गोळा करण्यात आलेल्याची योग्य विल्हेवाट न.प. प्रशासन लावणार आहे. प्रत्येक कृत्रिम हौदाच्या ठिकाणी एक अधिकारी व दोन कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत गणेशभक्तांना सेवा देणार आहेत, हे विशेष.
या ठिकाणी राहणार कृत्रिम हौद
वर्धा शहरातील दादाजी धुनिवाले मठ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मगनवाडी भागातील बजाज बालमंदीर चौक, सोशालिस्ट चौक, आर्वी नाका चौक, बजाज चौक, महात्मा गांधी पुतळा चौक, रामनगर भागातील गर्जना चौक या ठिकाणी न.प.च्यावतीने गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद ठेवण्यात येणार आहेत.
वैद्यकीय जनजागृती मंचचा पुढाकार
वर्धा शहरातील हनुमान टेकडीवर वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने यंदाही तीन विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे. मागील वर्षी २ हजार २०० गणेशमुर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले होते. यातील माती ही नि:शुल्क शहरातील मूर्तीकारांना वैद्यकीय जनजागृती मंचने दिली आहे. त्यातून यंदा ४०० मातीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या. यंदाही ४ हजार मूर्ती विसर्जनाची तयारी केली आहे, हे उल्लेखनिय.
वर्धेकरांनी मागणी वर्षी आमच्या पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. संभाव्य प्रदुषण टाळण्यासाठी यंदाही आम्हाला वर्धेकरांची साथ गरजेची आहे. गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन न.प.च्या कृत्रिम हौदात करावे.
- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, न. प. वर्धा.