दोन रेती घाट धारकांना आठ लाखांचा दंड
By admin | Published: April 1, 2015 01:52 AM2015-04-01T01:52:36+5:302015-04-01T01:52:36+5:30
स्मॅट प्रणालीनुसार जिल्ह्यात १५ घाटांतून रेतीचा उपसा होत आहे़ असे असले तरी प्रत्यक्षात किती घाट सुरू आहे, ...
वर्धा : स्मॅट प्रणालीनुसार जिल्ह्यात १५ घाटांतून रेतीचा उपसा होत आहे़ असे असले तरी प्रत्यक्षात किती घाट सुरू आहे, हे निरीक्षणानंतरच समोर येणार आहे़ यात अनेक घाटांवर नियमांना बगल देत रेतीचा अतिरेकी उपसा केला जात आहे़ अशाच दोन घाटांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर आणखी एका घाटावर कारवाई होणार असल्याचे खनिकर्म विभागाद्वारे सांगण्यात आले आहे़
खनिकर्म विभागाच्यावतीने काही घाटांची तपासणी करण्यात आली होती़ यात आपटी रेती घाटामधून अधिक उत्खनन केल्याचे निदर्शनास आले. या घाटधारकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी बढे यांनी सांगितले़ शिवाय सायखेडा घाटाचेही खनिकर्म अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले होते़ या प्रकरणातही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या घाटातून ९८ ब्रास रेतीचा अतिरिक्त उपसा करण्यात आल्याचे निरीक्षणात निदर्शनास आले़ या घाटधारकाकडून ५ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केल्याचेही सांगण्यात आले़ घाटधारकांना हिशेब सादर करावा लागतो़ यानंतर अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यास ते मोजमाप करतात़ यानुसारच निरीक्षणादरम्यान केलेल्या मोजमापात अतिरिक्त रेती उपसा झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर सायखेडा येथील रेती घाटावर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील अन्य घाटांतही असाच प्रकार सुरू असून रेतीचा अतिरेकी व यंत्रांद्वारे उपसा केला जात आहे़ सर्व घाटांचे निरीक्षण गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)