आठही पंचायत समितीच्या शिलेदारांची होणार निवड
By admin | Published: March 13, 2017 12:40 AM2017-03-13T00:40:56+5:302017-03-13T00:40:56+5:30
पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर यात बहुतांश ठिकाणी भाजपाची सरशी असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
मंगळवारी निवडणूक : शिमग्यानंतर गुलालाची उधळण
वर्धा : पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर यात बहुतांश ठिकाणी भाजपाची सरशी असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. असे असतानाही भापजाच्यावतीने आठही पंचायत समितीत आपलाच सभापती बसावा याकरिता प्रयत्न सुरू आहेत. आठही पंचायत समितीची निवडणूक मंगळवारी होणार आहे. यामुळे कोणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडते व शिमग्यानंतर कोणाला गुलाल लागतो याकडे अनेकांच्या नजरा आहे.
वर्धा, देवळी, सेलू, आर्वी, आष्टी, कारंजा (घाडगे), समुद्रपूर व हिंगणघाट या आठही पंचायत समितीची निवडणूक शिमग्यानंतर होणार आहे. यामुळे होळीच्या पूर्वीपासूनच विविध पक्षाच्यावतीने सत्तेकरिता आकडेमोड करणे सुरू केले आहे. यात सत्तेकरिता आवश्यक जादुई आकडा जमविण्याकरिता युती, आघाडी व गठबंधनाचे प्रयत्न सुरू केले आहेत. ज्या पंचायत समितीत हा आकडा जुळला आहे तेथील गटनेता काही सदस्यांना घेवून सहलीवर गेल्याची चर्चा आहे. हे सदस्य निवडणुकीच्या काही काळापूर्वीच वर्धेत दाखल होणार आहे. यामुळे जुळलेले गणित वेळेवर बिघडणार नाही, याची दक्षात घेण्यात येत आहे.
जिल्ह्यातील समुद्रपूर, कारंजा (घाडगे), आर्वी, देवळी, आष्टी (शहीद), हिंगणघाट व वर्धा पंचायत समितीत भाजपाला बहुमत असल्याने येथे त्यांची सत्ता येणे आहे. तर सेलू येथे भाजपा आणि काँग्रेसकडे समान संख्याबळ असल्याने येथे कोणाची सत्ता बसते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. येथील पंचायत समितीचा सभापती इश्वर चिठ्ठीने निवड होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
सेलूत ईश्वर चिठ्ठीचा आधार
येथील पंचायत समितीच्या १२ जागांपैकी काँग्रेस व भाजपाने प्रत्येकी सहा जागा जिंकल्या. त्यामुळे सेलू पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदाच्या निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीमुळे येथे चमत्कार होवू शकते, अशी चर्चा आहे. सेलू पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला (ओबीसी महिला) साठी राखीव आहे. काँग्रेसच्या शेंडे-जयस्वाल गटात निवडणुकीपूर्वीच समझोता होवून मैत्रीपूर्ण जागा वाटप करून घेतल्या. यामुळे मतभेद झाले नाही. काँग्रेसकडून नलूबाई मारोतराव बेले (सुकळी स्टे. गण), सुनीता दीपक अडसड (आमगाव (म.) गण) प्रणिता प्रदीप भुसारी (वघाळा गण) या तीन महिला पैकी एकीच्या गळ्यात तर भाजपाकडून ज्योती खोडे (केळझर गण) या एकमेव उमेदवार असल्याने यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडू शकते.