१२ किमीच्या महामार्गात अठरा कोटींचे घबाड, काम न करताच देयक काढून शासनाला लावला चुना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 04:06 PM2023-09-01T16:06:17+5:302023-09-01T16:06:34+5:30

तळेगाव-आर्वी राष्ट्रीय महामार्गातील वास्तव

Eighteen crores payment for 12 km highway, defrauding the government by withdrawing payment without work | १२ किमीच्या महामार्गात अठरा कोटींचे घबाड, काम न करताच देयक काढून शासनाला लावला चुना

१२ किमीच्या महामार्गात अठरा कोटींचे घबाड, काम न करताच देयक काढून शासनाला लावला चुना

googlenewsNext

अमोल सोटे

आष्टी (शहीद) : तळेगाव (श्याम पंत) ते आर्वी या बारा किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाला गेल्या चार वर्षांपासून साडेसाती लागली आहे. आतापर्यंत दोन कंत्राटदार बदलण्यात आले असून तिसऱ्याची नियुक्ती करण्यात आली; पण अद्यापही कामाचा थांगपत्ता नाही. आतापर्यंत झालेल्या कामामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी हात मिळवणी करून काम न करताही तब्बल १८ कोटींचे देयक अदा करून शासनाला चुना लावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

तळेगाव ते आर्वी या बारा किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये आतापर्यंत ७० कोटींचा निधी खर्च करण्यात आला असून यात निम्मेही काम पूर्णत्वास गेले नाही. या कामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे असून या विभागातील सर्वच अधिकारी कंत्राटदार एजन्सीच्या मर्जीत वावरत असल्याने चार वर्षांनंतरही काम पूर्णत्वास गेले नाही. परिणामी, हा महामार्ग अनेकांकरिता काळ ठरला असून अपघातातही वाढ झाली आहे. कामाचे वारंवार सुधारित दराने अंदाजपत्रक तयार करणे, जवळच्या एजन्सीला त्यानुसार कामे देणे, नंतर त्याच एजन्सीकडून काम परवडत नसल्याची बोंबाबोंब करणे. त्यातूनच खोटे व बनावट देयक काढणे, असा सावळागोंधळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी चालविला.

काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीकरिता लोकप्रतिनिधींनी निवेदने, धरणे-आंदोलने केली. विविध कार्यालयांवर मोर्चाही काढला; पण त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे या महामार्गाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यात बनावट देयकाच्या आधारे १८ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती खुद्द महामार्गाच्या एका अधिकाऱ्यानेच नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. यासंदर्भात पुराव्यानिशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी गोपनीय चौकशीही करण्यात आली आहे. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांमध्येच आपसी वाद-विवाद असून हे सर्व गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून यात अनेक अधिकारी अडकण्याची शक्यता आहे.

महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्याचे हात वर

सुरुवातीला या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वर्धा यांच्याकडे होते. या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खुर्च्या नेहमीच खाली राहत असून दौऱ्याचेच कारण दिले जातात. त्यानंतर हे काम नागपूर महामार्ग कार्यालयाकडे हस्तांतरित करून तेथून कारभार चालविण्यात आला. आता पुन्हा दुसऱ्या विभागाला जबाबदारी देऊन काम करणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले. यासाठी नागपूर येथील एका एजन्सीची नेमणूक करण्यात आली. त्या एजन्सीचे नावसुद्धा आम्हाला माहीत नाही. आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. असे बोलून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंत्याने आपली भूमिका झटकली. आता या राष्ट्रीय महामार्गाचा वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिकाऱ्यांकडून तक्रारीला केराची टोपली

या महामार्गाचे सुरुवातीला खोदकाम करून ठेवले आणि अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला सिमेंटीकरणापर्यंतचे देयक देऊन मोकळे झाले. चार वर्षांचा कार्यकाळ होऊनही काम पूर्ण झाले नसल्याने या कामातील १८ कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी तळेगाव, आष्टी, वर्धमनेरी, आर्वी येथील नागरिकांनी वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे केली; पण या भ्रष्टाचारात लुप्त असलेल्या अधिकाऱ्यांनी तक्रारींना केराची टोपलीच दाखविली.

माहिती अधिकारालाही दाखविल्या वाकुल्या

या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणकडे असल्याने अनेकांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याचा प्रयत्न केला; परंतु येथील अधिकाऱ्यांनी माहितीच उपलब्ध करून न देता एकमेकांकडे बोट दाखविण्याचेच काम केले. नागपूरचे उपविभागीय अभियंता टाके यांच्याकडे या महामार्गाची जबाबदारी असल्याने त्यांना या महामार्गाच्या खर्चाची माहिती मागितली असता आता हा महामार्ग आमच्याकडून दुसऱ्या विभागाकडे गेला. त्या विभागाचे अधिकारी जगताप यांच्याशी संपर्क साधा, असे सांगितले. जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.

तळेगाव - आर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून शेकडो अपघात झाले तरी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. वारंवार निविदा प्रक्रिया आणि भ्रष्टाचार करणे एवढाच उद्योग सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

- रूपेश बोबडे, शिवसेना तालुकाप्रमुख, आष्टी (शहीद).

Web Title: Eighteen crores payment for 12 km highway, defrauding the government by withdrawing payment without work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.