वर्धा जिल्ह्यातील बेलोरावासियांचे सामूहिक लक्ष्मीपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:28 AM2017-10-23T10:28:06+5:302017-10-23T10:32:17+5:30
आष्टी शहीद तालुक्यातल्या बेलोरा (बुजरुक) येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या तरुणांनी एक गाव एक लक्ष्मीपूजन अशी नवी संकल्पना मांडली.
आॅनलाईन लोकमत
वर्धा: केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ही उक्ती सार्थ ठरवित आष्टी शहीद तालुक्यातल्या बेलोरा (बुजरुक) येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या तरुणांनी एक गाव एक लक्ष्मीपूजन अशी नवी संकल्पना मांडली. येथे गावकºयांनी एकत्र येत लक्ष्मीपूजन केले. या एकत्रित लक्ष्मीपूजनातुन धार्मिक व सामाजिक सलोखा वाढीस लागला आहे.
गत दोन वर्षांपासून बेलोरा (बुजरुक) गावात दिपावलीच्या शुभपर्वावर जय गुरुदेव लक्ष्मी मंडळ व सर्व गावकरी मिळून गावात लक्ष्मी मातेची स्थापना करतात. दहा दिवस गुरुदेव नगरीत भजन, कीर्तन, समाजप्रबोधन व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही तसाच उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मंडळाच्या युवकांनी एका मंडपात पर्यावरण रक्षणाकरिता पूर्णपणे नैसर्गिक साहित्याचा वापर करून मंडप तयार केला. ग्रामीण भागातील संस्कृती जोपासण्याचा यातून प्रयत्न केल्याचेही मंडळाच्यावतीने सांगण्यात येते.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर गावात लक्ष्मी मातेची स्थापना करण्यात आली. यांनतर पडोळे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यानंतर प्रबोधनकार सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्तखंजेरीवादक रामपाल महाराज यांचा पंचरंगी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. लक्ष्मी पूजनानंतर भजन, कीर्तन तसेच विविध सामाजिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. गावातील वाद-विवाद, जात-धर्म, राजकारण या सर्व बाबी बाजुला ठेवत सर्व गावकरी एकत्र आले आहे. एक वेगळेच वातावरण बेलोरा गावात तयार झाले आहे. जय गुरुदेव लक्ष्मी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मी माता मंडप तुराट्या, बांबु, माती लाकडाच्या पाट्यापासून तयार केला. यामध्ये जाते, चुल, सुप, पारडी, तांबा ,पितळची भांडी, मातीची मडकी, कंदील, चिमणीचा खोपा तयार करुन संस्कृतीचेही दर्शन घडविले आहे.
गावात धार्मिक एकोप्यात वृद्धी
च्शासनाच्यावतीने एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे. हीच संकल्पना मनात घेऊन तालुक्यातील बेलोरा येथील नागरिकांनी दिवाळी सारख्या सणात एक गाव एक लक्ष्मीपूजन ही संकल्पना अंमलात आणली. फटाक्यामुळे होणाºया प्रदूषणालाही आळा बसला शिवाय गावात धार्मिक एकोप्यात वृद्धी झाल्याचे दिसत आहे.