निवडणूक देतेय मजुरांना रोजगार; शेतीकामासाठी नकार, प्रचारासाठी रोजंदारीवर मजुरांचा भर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 05:32 PM2024-11-15T17:32:02+5:302024-11-15T17:33:23+5:30
शेतकऱ्यांची धावाधाव : नाष्टा पाण्यासह दोन वेळच्या खाण्यापिण्याची व्यवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या. पंत.): निवडणुकीचा धूमधडाका सुरू आहे. प्रचारासाठी गर्दीची आवश्यकता आहे. मात्र आता पूर्वीसारखे निवडणुकांमध्ये घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे कार्यकर्ते उरले नाहीत. त्यामुळे उमेदवारांना गर्दी जमवण्यासाठी वेगळ्या क्लृप्त्या लढवाव्या लागतात. विरोधकांना प्रचाराची गर्दी बघता धडकी भरावी, यासाठी रोजंदारीने मजूर लावण्यात येत असल्याचे चित्र विधानसभा क्षेत्रात दिसून येत आहे.
नाष्टा पाण्यासह दोन वेळच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होत असल्याने शेतीकामावर येण्यास शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे मजुरांसाठी शेतकऱ्यांची धावाधाव होत आहे. यंदा निवडणूक आणि शेतात कापूस वेचणीसह रब्बी पेरणीचा हंगाम एकत्रच आला. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून लोकप्रतिनिधी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी जमविण्यासाठी नियोजन करण्यात आले. बॅनर लावण्यापासून प्रचार सभेत, रॅलीत दिखाऊ गर्दी दाखविण्यासाठी शेतमजूर, घरकाम करणारे, धुणी भांडी करणारे, घरी छोटे मोठे काम करून रोजंदारीवर काम करणारे अशा कामगारांना गाठून प्रचारात ओढले जात आहे. बहुतेक कामगार मंडळी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाली असल्याने छोटी मोठी कामे करणाऱ्या कंत्राटदारांना कामगार मिळेनासे झाले आहेत. निवडणुकीत प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुका, प्रचार फेरी, कॉर्नर सभा, घरभेटी आणि सभांना लागणाऱ्या गर्दीसाठी मोठ्या प्रमाणात कामगारांचा वापर केला जात आहे. परिणामी सध्या कामगारांना अच्छे दिन आले आहेत.
मजूर, दिवसभर उन्हात कामे करत फिरण्यापेक्षा दोन तीन तासांत दिवसभराची मजुरी मिळत असल्याने अनेक कामगारांनी निवडणूक प्रचाराचे झेंडे हाती घेतले आहेत. केवळ पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सभा यशस्वी होत नाही. त्यासाठी लोकांची गर्दी आवश्यक असते. त्यासाठी सध्या महत्त्वाचा घटक ठरला आहे तो रोजंदारीवर काम करणारे कामगार, निवडणुकांमुळे या वर्गालाही अधिक महत्त्व आले आहे. सभांना गर्दी असेल तरच त्या नेत्याचा प्रभाव पडतो. वर्तमानपत्रेही त्याची दखल घेतात. गर्दी नसेल तर उलटा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्दी जमविण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते ही युक्ती लढविताना दिसत आहेत.
आजचे भागतेय, उद्याचे पाहू?
कामगारांना एरवी कामानुसार दिवसभराचा तीनशे ते पाचशे रुपयांचा मोबदला मिळतो. दररोज काम मिळेलच याची खात्री या कामगारांना नसते. मात्र, निवडणुकांचा हंगाम असल्याने कामगारांना सुगीचे दिवस आले आहेत. निवडणूक रोजगार हमी योजना' पुढील काही दिवस तरी सुरू राहणार आहे. मात्र, प्रचाराची लढाई संपल्यावर पुन्हा या कामगारांची मजुरी, रोजगाराची लढाई सुरू होईल हे निश्चित आहे. आजचे भागतेय ना उद्याचे उद्या पाहू असे बोलताना मजूर दिसून येत आहेत.
निवडणूक प्रचाराचा ज्वर शिगेला
निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. गावे, वाडीवस्ती पिंजून काढण्यासाठी उमेदवार व समर्थकांनी पायाला भोवरा बांधला असून, मतदारसंघातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकालाच मोठे दिव्य करावे लागत आहे. मतदारसंघाचा आवाका व पसारा पाहता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता येणे अशक्यप्राय गोष्ट असून, यावर मजुरीवरील कार्यकर्त्यांचा उपाय उमेदवारांनी शोधून काढला आहे.