अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 05:14 PM2022-11-08T17:14:52+5:302022-11-08T18:44:45+5:30
Wardha News विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
वर्धाः विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्ध्यामध्ये ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन वर्ध्यातील स्वावलंबी शाळेच्या पटांगणावर ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीकरिता मंगळवारी अनेकांत स्वाध्याय मंदिराच्या सभागृहात अ. भा. मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला १९ पैकी १८ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून अध्यक्षपदाकरिता आलेल्या आठ नावांवर चर्चा करण्यात आली. यातून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीत संमेलनादरम्यान होणार असलेल्या कार्यक्रमांची रूपरेषाही ठरविण्यात आली आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा करून होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली.
पत्रकार परिषदेला महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, कार्यवाहक डॉ. उज्ज्वल मेहेंदळे, कोषाध्यक्ष पराग पागे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, प्रकाश होळकर, मनोहर सप्रे, दादा गोरे, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. किरण सगर, ए. के. आकरे, प्रकाश गर्गे, प्रदीप दाते, विलास मानेकर, डॉ. गजानन नारे, डॉ. भारत सासने, संजय इंगळे तिगावकर, डॉ. राजेंद्र मुंडे, रंजना दाते, महेश मोकलकर, डॉ. स्मिता वानखेडे, बावीसकर, शेख हाशम, आकाश दाते, विकास लिमये, उदय पाटणकर, विवेक अलोणी, प्रदीप मुन्शी, इंद्रजीत ओरके, प्रदीप मोहिते, अनिल गडेकर व प्रमोद कळमकर यांची उपस्थिती होती.
मावळते अध्यक्ष करणार ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन
संमेलनस्थळी ग्रंथप्रदर्शनाकरिता ३०० गाळ्यांची निर्मिती केली जाणार असून, प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि यांच्या सोईकरिता संमेलनाच्या आदल्या दिवशी २ फेब्रुवारीला मावळत्या अध्यक्षांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ३ फेब्रुवारीला सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून, १०. ३० वाजता महामंडळाच्या ध्वजवंदनाने संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कविसंमेलन, कवी कट्टा असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.