वर्धा बाजार समितीची निवडणूक
By admin | Published: July 1, 2016 02:10 AM2016-07-01T02:10:15+5:302016-07-01T02:10:15+5:30
येथील बाजार समितीच्या सभापतीपदाचा शरद देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदाकरिता शुक्रवारी दुपारी १ वाजता निवडणूक होऊ घातली आहे.
सभापतीपद सुरेश देशमुख गटालाच?
वर्धा : येथील बाजार समितीच्या सभापतीपदाचा शरद देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदाकरिता शुक्रवारी दुपारी १ वाजता निवडणूक होऊ घातली आहे. बाजार समितीच्या सभापती पदावर आतापर्यंत देशमुख गटाचा सदस्य राहत आला असून तीच परंपरा कायम राहणार असल्याची माहिती आतील गोटातील आहे; मात्र सभापतीपदी कोणाची वर्णी लागेल याचे नाव सहकार गटाचे नेते माजी आमादार प्रा. सुरेश देशमुख निवडणुकीच्या एक तासापुर्वी जाहीर करणार असल्याची माहिती आहे.
बाजार समितीत आजच्या घडीला प्रा. सुरेश देशमुख व आमदार रणजीत कांबळे यांच्या गटाच्या युतीची सत्ता आहे. यात देशमुख गटाकडे सात सदस्य होते. अशात सभापती पदाचा राजीनामा व समितीतील कामकाजात अनियमिततेचा ठपका ठेवत शरद देशमुख यांचे सभासत्त्व रद्द झाल्याने त्यांच्याकडे सहाच सदस्य राहिले आहे. तर आ. कांबळे गटाकडे पाच सभासद आहे. या व्यतिरिक्त अपक्ष असलेले दोन सदस्यही सत्ताधारी गटाशी हातमिळवणी करून आहे. बाजार समितीत भाजपाकडे तीन सभासद आहे. यामुळे येथे कोणती मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. देशमुख आणि आ. कांबळे गटाच्या युतीत असलेल्या ११ सभासदाचा आकडाच नवा सभापती निवडणार आहे.
असे असले तरी सभापती पदाच्या उमेदवाराच्या नावाबबातचे गुढ अद्याप कायम आहे. सभापतीपद देशमुख गटाला जाणार असल्याने सहा सदस्यांपैकी ज्या नावावर सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख बोट ठेवतील तो सभापती होईल, हे निश्चित. असे असले तरी सभापती पदाकरिता ज्येष्ठ सभासद श्याम कार्लेकर व रमेश खंडागळे या दोन नावाची चर्चा असल्याची माहिती आतल्या गोटाने दिली. सभापती पद जरी देशमुख गटाकडे गेले तरी उपसभापती पद कांबळे गटाकडे कायम राहणार आहे.
सभापती पदाचा उमेदवार निवडणुकीच्या एक तासापूर्वी जाहीर होणार असल्याने सर्वांचे लक्ष प्रा. सुरेश देशमुख यांच्या निर्णयाकडे लागले आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता समितीच्या सभागृहात ही निवडणूक होणार आहे. यात सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)