पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:28 PM2017-10-13T23:28:28+5:302017-10-13T23:30:27+5:30
गांधी जयंतीच्या दिवशी गणपूर्ती अभावी तहकुब झालेली सभा मंगळवारी झाली. येथेही पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष निवडीवरून गोंधळ झाल्याने सदर सभा गुरुवारी पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : गांधी जयंतीच्या दिवशी गणपूर्ती अभावी तहकुब झालेली सभा मंगळवारी झाली. येथेही पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष निवडीवरून गोंधळ झाल्याने सदर सभा गुरुवारी पार पडली. बाजार चौकात जि.प. सदस्य विनोद लाखे यांच्या अध्यक्षतेखाली तणावाच्या वातावरणात पार पडली. यावेळी अध्यक्ष म्हणून गोविंदा घंगारे याची निवड झाली. यावेळी २४ लोकांची समिती गठित करण्यात आली.
चार तास चाललेल्या या निवड प्रक्रियेत ३९८ ग्रामस्थांनी मतदान केले. सकाळी सभेला सुरुवात झाल्यानंतर पाणीपुरवठा समितीतील सदस्यांची जनतेतून निवड झाली. यात २२ सदस्य एक अध्यक्ष व ग्राम विकास अधिकारी पदसिद्ध सचिव अशा २४ जणांची निवड झाली.
सभेत अध्यक्ष पदाकरिता ११ नावे आली होती. त्यापैकी आठ जणांनी आपली नावे मागे घेतली. तर राहिलेल्या तिघांतील गोविंदा घंगारे, आनंद खोब्रागडे व क्रिष्णा वाकडे यांच्यात निवडणूक झाली. यात गोविंदा घंगारे विजयी झाले. त्यांना २४० मते मिळाली. खोब्रागडे यांना ३८ व क्रिष्णा वाकडे यांना ११० मते मिळाली. मतमोजणीनंतर क्रिष्णा वाकडे व आनंद खोब्रागडे यांनी बोगस मतदान झाल्याचा आक्षेप घेत फेर मतदान घेण्याची मागणी केली होती. परंतु उपस्थित ग्राम विकास अधिकारी ढोक, भंते सदानंद महास्थविर, सरपंच रेखा शेंदरे, उपसरपंच फाऊख शेख, युसूफ शेख, विनोद लाखे यांनी त्यांची समजूत घातली व घंगारे यांना विजयी घोषित केले.
सरपंच रेखा शेंदरे यांच्यावर मतदानाच्यावेळी मते बिघडविण्याच्या आरोप करीत हमीदा शेख यांनी सरपंच व उपसरपंच यांच्याशी वाद घातल्याने काही काळ तणावाची स्थिती होती.