महिनाभरापासून वीजतारा तुटलेल्याच
By admin | Published: June 8, 2017 02:30 AM2017-06-08T02:30:50+5:302017-06-08T02:30:50+5:30
परिसरात एक महिन्यापूर्वी आलेल्या वादळात परिसरातील वीजखांब कोसळले होते. या घटनेला एक महिना लोटला तरी तुटलेल्या वीजतारा
शेतकऱ्यांना मनस्ताप : तक्रार करुनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदोरी : परिसरात एक महिन्यापूर्वी आलेल्या वादळात परिसरातील वीजखांब कोसळले होते. या घटनेला एक महिना लोटला तरी तुटलेल्या वीजतारा व खांब पूर्ववत करण्यात आलेले नाही. याचा त्रास ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
या घटनेची तक्रार ग्रामस्थांनी महावितरणकडे केली. मात्र दुर्लक्षित धोरणामुळे आजवर तारा व खांबाची दुरुस्ती केलेली नाही. वादळामुळे येथील विकास विद्यालय मार्गावरचे विजेचे खांब तुटले. यावरील तारा इतरत्र विखुरल्या आहे. खांबावरील गार्डिंग खाली आली आहे. याला सहज कुणाचाही हात लागू शकतो त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून काही नागरिकांनी बांबूच्या सहायाने या लोंबकळत्या तारा रस्त्यापासून दूर केल्या. याशिवात गावातील इतरही ठिकाणी गार्डींग तुटून पडल्या आहे.
विकास विद्यालयासमोरील मार्ग मुख्य रस्ता असल्याने येथून सतत वर्दळ असते. या रस्त्यावर वीजखांब आडवे पडले असून तारा तुटल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचण येते. येथील पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने काळोखाचा सामना करावा लागतो. नंदोरी येथील वीज वितरणच्या अभियंता कार्यालयात तक्रार देऊन तुटलेल्या तारांचे दुरुती करण्याची मागणी केली. यानंतर याकडे दुर्लक्ष होत आहे. तक्रारीसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागते.
नागरिकांनी अर्ज केल्यावर त्यांना दोन ते तीन महिन्यांपासून मीटर मिळत नाही. नंदोरी ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर एक्सप्रेस फिडर बसविले नसल्याने पाणी पुरवठ्यावर याचा परिनाम होतो. यामुळे नंदोरी गावात कृत्रिम पाणीटंचाई आहे. परिसरातील अनेक विद्युत खांबावर काटेरी झाडे झुकली आहे. त्यामुळे वीजतारांमध्ये घर्षण होऊन वीज पुरवठा खंडित होतो.
उघडी डीपी ठरते धोकादायक
येथील हनुमान मंदिर परिसरात व्यायाम शाळा असून येथे युवक व चिमुकलेही व्यायाम करायला जातात. या परिसरातील वीजपेटी नेहमीच खुली असते. अशात एखाद्या मुलाचा वायरिंगला स्पर्श झाल्यास धोका होण्याचा संभव आहे. याशिवाय वेळीअवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो.
वीजपुरवठ्याअभावी नळयोजना प्रभावित
पोहणा - गेल्या दोन दिवसांपासून बोपापूर व हिवरा येथे खंडित वीजपुरवठ्यामुळे नळयोजना प्रभावित झाली आहे. येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून बोपापूर व हिवरा येथील वीज पुरवठा नेहमीच खंडित होत असल्याच्या तक्रारी आहे. येथील नागरिक कमालीचे त्रस्त असून वीज वितरण कंपनीच्या कारभारावावर संताप व्यक्त होत आहे. वाकलेले खांब, झाडांना स्पर्श होणाऱ्या तारा यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे तक्रारीकडे लक्ष दिले जात नाही. या परिसरातील अनेक रोहित्र नादुरूस्त असल्याने याकडे वीज पुरवठा प्रभावीत होत जाते. वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतल्या जात नाही. येथील खंडित वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बोपापूर व हिवरा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.