दोन अपघातात अकरा जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:43 PM2018-06-17T23:43:45+5:302018-06-17T23:43:45+5:30
दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात अकरा जण जखमी झालेत. यातील सात जण गंभीर असून त्यांच्यावर नागपूर, सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही अपघात रविवारी कारंजा, सावंगी (मेघे) शिवारात घडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/कारंजा (घा.) : दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात अकरा जण जखमी झालेत. यातील सात जण गंभीर असून त्यांच्यावर नागपूर, सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही अपघात रविवारी कारंजा, सावंगी (मेघे) शिवारात घडले.
ट्रक क्र. टीएन २८ एई ६६८८ हा बोरींग मशीनसह सोलापूर येथून पांढूर्णा (म.प्र.) येथे भारसिंगी मार्गे जात होता. ट्रकमध्ये बोरींगचे रॉड होते. कारंजा येथून आठ किमी अंतरावर तरोडा चक्रीघाटात बोरींग मशीनचा हा ट्रक रविवारी सकाळी ८ वाजता पलटी झाला. यात ८ मजूर जखमी झाले असून ४ मजूर गंभीर आहेत. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. बोरींग मशीन गाडीवर १५ मजूर होते. गाडी पलटी झाली त्यावेळी एका झाडाला अडल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा खाली ४० ते ५० फुट खोल दरी होती. मजूर ओडीसा येथील असून रूखधर घोर (३२), शोभा लकी (१९), तुळशीराम जाणी (२५), टिनात लकी जाणी (१८), रघु उज्जरे (१९), लक्ष्मीपुत्र बिरासदार (२७), दन्शंल चंदर (२०), देवसिंग माधव (४०) अशी जखमींची नावे आहे.
मालवाहू ट्रकवर आदळला, तिघे जखमी
वर्धा - भरधाव मालवाहूचा टायर अचानक पंक्चर झाला. यामुळे अनियंत्रित मालवाहू समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळला. हा अपघात रविवारी सकाळी वर्धा-देवळी मार्गावरील सावंगी शिवारातील राजीवनगर परिसरात झाला. यात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वर्धेकडून देवळीकडे एमएच ३२ क्यू ३२४४ क्रमांकाचा मालवाहू भाजीपाला घेऊन जात होता. भरधाव मालवाहूचा सावंगी शिवारात अचानक टायर पंक्चर झाला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून मालवाहु देवळीकडून वर्धेकडे येणाºया एमएच ४०/७७१७ क्रमांकाच्या ट्रकवर धडकला. दरम्यान, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून तो रस्त्याच्या कडेला झाडावर धडकला. या अपघातात मालवाहूचा चालक व त्यातील एक व्यक्ती तसेच ट्रकचालक, असे तिघे जण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. सावंगी ठाण्याचे पंढरी मोहदूरे व समीर फटींग यांनी पंचनामा केला. या घटनेची सावंगी पोलिसांनी नोंद घेतली असून वृत्त लिहिस्तोवर जखमींची नावे कळू शकली नाही.