अकरा गावांवर पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:08+5:30
आष्टी तालुक्यामध्ये ११ गावांमध्ये या वर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, पांढुर्णा, बोरखेडी, चामला, ठेकाकोल्हा, कोल्हाकाळी, मुबारकपूर, किन्ही, मोई या गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : यंदा वेळोवेळी झालेल्या पावसामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी वाढली होती. मात्र, उन्हाळ्याची चाहूल लागताच विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्याचे बघावयास मिळत आहे. इतकेच नव्हे, तर तालुक्यातील ११ गावांवर पाणी टंचाईचे सावट आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.
आष्टी तालुक्यामध्ये ११ गावांमध्ये या वर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, पांढुर्णा, बोरखेडी, चामला, ठेकाकोल्हा, कोल्हाकाळी, मुबारकपूर, किन्ही, मोई या गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रेडझोन, डार्क झोन, येलो झोन या तिन्ही झोनमध्ये विभागणी झालेल्या अवर्षणप्रवण गावांमध्ये पाण्याची समस्या भीषण निर्माण होणार आहे. थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गवळी बांधव आहेत. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करून ते कुटुंबाचा गाडा हाकतात. पण जनावरांसाठी चारा आणि पाण्याची कमतरता भासण्यास सुरूवात झाल्याने या गावातील जनावरांना दुसरीकडे न्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी समस्या आणखी भीषण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मोई गावासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले होते. या गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. आमदार दादाराव केचे यांनी सदर प्रश्न मार्गी लावला होता. मात्र, जि.प.कडून अद्याप या कामाची सुरुवात झाली नाही. त्यामुळे मोई गावालासुद्धा यावर्षी पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या गावातील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन विहीर आणि टाकीचे काम जलदगतीने होणे क्रमप्राप्त असताना अद्याप काम पूर्णत्वास गेलेले नाही.
पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे
किनी, मोई व मुबारकपूर या जंगलव्याप्त भागात अस्वल, वाघ, बिबट या वन्य प्राण्यांचा वावर असतो. अशातच पाण्याच्या शोधात वन्यप्राणीही गावाकडे येत असल्याचे वास्तव आहे. या गावांसह पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव येथे आवश्यक ठिकाणी बोअरवेल खोदण्याची गरज आहे.
तीन दिवसांआड होतोय पाणी पुरवठा
सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेअंतर्गत नियमित वेळेवर पाणी मिळत नाही. अनेक गावांमध्ये दोन-तीन दिवसांत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. थार, बोरखेडी, बांबर्डा, चामला या गावांमधील संत्रा बागा आतापासूनच पाण्याअभावी करपत असल्याचे बघावयास मिळते. त्यामुळे संत्रा उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.
पाणीटंचाई या विषयावर पंचायत समितीत आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी आढावा सभा घेण्यात आली. यामध्ये विविध उपाययोजना करण्यासंदर्भात जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सूचना दिलेल्या होत्या. त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली याचा आढावा आणखी घेतला जाईल. तसेच ज्या गावांमध्ये पाणीटंचाई जास्त आहे. तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.
- अनिल गावंडे, गटविकास अधिकारी, पं.स. आष्टी (शहीद).