अकरा जलाशयातील पाणीसाठा तळालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:19 PM2018-10-20T22:19:54+5:302018-10-20T22:20:29+5:30
यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे. सध्या सर्व जलाशयामध्ये केवळ ४१.३६ टक्के च पाणी उपलब्ध असल्याने डिसेंबर महिन्यापासूनच पाणीबाणी सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू, वर्धा व देवळी या आठही तालुक्यात पावसाने यावर्षी दडी मारली. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसात दमदार पाऊस झाला नसल्याने नद्या व जलाशय अद्यापही तहाणलेलच आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यावर या एकाच पावसाने नद्या, नाल्यांना पूर आला होता. या एकाच पावसामुळे जलाशयाच्या पातळीत थोडी का होईना; पण वाढ झाली. आता पर्यंत जिल्ह्यामध्ये ७७ टक्के च पावसाची नोंद करण्यात आली आहे. या अल्प पावसामुळे वर्धा नगरपालिकेसह इतरही ग्रामपंचायतीमध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला आहे.
अजून हिवाळाही उलटायचा असतानाच ही परिस्थिती असल्याने उन्हाळ्यात परिस्थिती चिंतनीय आहे. डिसेंबर महिन्यापासूनच नागरिकांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने आतापासूनच पाणी बचतीशिवाय दुसरा पर्याय नाही. शहरात पाणी पुरवठा प्रभावित होणार आहे.
रब्बी हंगामही धोक्यात
जिल्ह्यातील अकरा जलाशयातून पिण्याकरिता, शेतीकरिता व उद्योगाकरिता पाणी पुरवठा केल्या जातो. सध्या जलाशयात ४१.३६ टक्के जलासाठा उपलब्ध आहे. यातील १५ टक्के पाणी हे संरक्षित ठेवल्या जाते तर उर्वरीत पाण्यातून पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देण्यात येते. त्यानंतर सिंचन आणि नंतर उद्योगाला पाणी देणे अपेक्षीत आहे. परंतु सिंचनाला पाणी देण्यासाठी सिंचन विभागाने असमर्थता दर्शविल्याने यावर्षीचा रब्बी हंगामही अडचणी आला आहे. खरिपातही शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागता तर आताही पाण्याअभावी रब्बीतही नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.