वैदर्भीय बेरोजगार युवकांचा एल्गार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 09:51 PM2018-05-31T21:51:19+5:302018-05-31T21:51:19+5:30
हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील वैदर्भीय बेरोजगार युवकांतर्फे गुरुवारी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. शासनाने गत २० वर्षांपासून प्रशासनात करावयाच्या नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवून वर्षात ७२ हजार नवीन नेमणुका करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा गत आठवड्यात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील वैदर्भीय बेरोजगार युवकांतर्फे गुरुवारी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. शासनाने गत २० वर्षांपासून प्रशासनात करावयाच्या नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवून वर्षात ७२ हजार नवीन नेमणुका करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा गत आठवड्यात केली. यात ७२ हजार नोकऱ्या विदर्भातील बेरोजगार युवकांना मिळाव्या याकरिता उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.
गत अनेक वर्षांपासून विदर्भातील तरुण बेरोजगार आहे. महाराष्ट्र शासनामध्ये अनेंकदा शासकीय नोकरभरती झाली; परंतु विदर्भातील बेरोजगार तरुणांना मात्र न्याय मिळाला नाही. नागपूर करारानुसार शासकीय नोकरीमध्ये सुद्धा विदर्भातील तरुणांना २३ टक्के वाटा मिळायला पाहिजे होता. तो मिळाला नाही. म्हणून १९६० पासून विदर्भामध्ये नोकरीच्या संदर्भात ४ लाख एवढा अनुशेष निर्माण झालेला आहे. गत अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने नोकरभरती केलेली नाही. यावर्षी मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार शासकीय पदे भरण्याचे जाहीर केले. ३६ हजार नोकऱ्या सन २०१८ मध्ये व ३६ हजार नोकऱ्या २०१९ मध्ये जाहीर केले आहे. विदर्भाचा अनुशेष लक्षात घेता ७२ हजार पदे विदर्भातील बेरोजगारांकरिता राखीव ठेवावे. यामुळे विदर्भाचा अनुशेष कमी होईल. यामुळे मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेवून विदर्भातील जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विदर्भ राज्य उपाध्यक्ष अनिल जवादे यांनी केले. या मोर्चामध्ये शहर अध्यक्ष शकील अहमद, संयोजक महेश माकडे, विधानसभा अध्यक्ष बंटी रघाटाटे, तालुका अध्यक्ष जयंत धोटे, युवा तालुका अध्यक्ष अश्विन तावाडे, महिला अध्यक्ष सुनिता भितघरे, युवा शहर अध्यक्ष अजय मुळे, महासचिव विक्की भितघरे, भारत पाटील, रहेमत खॉ पठाण, प्रवीण हटवार, रामू सोगे, सुरज शेंडे, सुमीत हिंगे, हेमा दुरबुडे, सुरत नौकरकर, निखिल तडस, निखिल डेकाटे, सुरज टिपले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.