शिष्यवृत्तीसाठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:06 AM2018-12-24T00:06:51+5:302018-12-24T00:07:27+5:30
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात संशोधन करणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकर स्टुडंट्स फोरम संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन केले. मागणीचे निवेदन कुलसचिवांना देत यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा,
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात संशोधन करणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकर स्टुडंट्स फोरम संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन केले. मागणीचे निवेदन कुलसचिवांना देत यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा, अन्यथा पुढील परिणामांना सामोर जाण्यासाठी तयार राहा, असा इशारा फोरमने दिला.
आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणावर आसूड ओढत शिक्षणाचे आर्थिक बजट कमी करीत असल्याचा आरोप केला. संशोधनाला चालना देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करणे अपेक्षित असताना कमी करण्याचा घाट घातला आहे. एकीकडे देशात संशोधकांची कमी आहे. अशावेळी हा निर्णय घेतल्याने संशोधनापासून अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार संशोधन शिष्यवृत्ती वाढविण्यात यावी, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप व सिनिअर रिसर्च फेलोशिपमध्ये ८० टक्के वाढ, नेट उत्तीर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुध्दा ज्युनिअर रिसर्च फेलोशिपप्रमाणे देण्यात यावी, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे नॅेशनल फेलोशिप फॉर हायर एज्युकेशन आॅफ एसटी स्टुडंट्सचे अर्ज लवकर काढण्यात यावे, महिलांना दिल्या जाणा-या नॅशनल पोस्ट डॉक्टरल फेलोशिपचे अर्ज भरण्यात यावे, दर चार वर्षांनी शिष्यवृत्तीवाढीचा अध्यादेश काढण्यात यावा, विद्यापीठ अनुदान आयोग व सीएसआयआरद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची प्रमाणपत्रे तत्काळ विद्यार्थ्यांना मिळावी आदी मागण्यांचे निवेदन कुलसचिवांना देण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व दिनेश पटेले यांनी केले. आंदोलनात रजनीश कुमार आंबेडकर, ब्रजेंद्र कुमार गौतम, श्वेता, अनिल कुमार, दिलीप गिºहे, पन्नालाल, दीनानाथ यादव, शिल्पा भगत, राहुल, नरेश गौतम, रणजित निषाद, राकेश आदी सहभागी होते.