मोर्चातून कर्मचाऱ्यांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 05:00 AM2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:26+5:30
कामगार व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सदर आंदोलनादरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. सदर मोर्चात शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, महसूल, आरोग्य आदी विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासकीय विभागांमधील खासगीकरण थांबविण्यात यावे. तसेच जुनी पेंशन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी विविध कामगार व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सदर आंदोलनादरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. सदर मोर्चात शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, महसूल, आरोग्य आदी विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी. वेतन त्रुटींचे तातडीने निवारण करण्यात यावे. बक्षिस समिती खंड २ प्रसिद्ध करण्यात यावा. सर्व रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्यात यावे. सेवानिवृत्तांचे वय ६० करीत पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा. महिला कर्मचाºयांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा देण्यात यावी. सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला शासकीय सेवेत घेण्यात यावे. शासकीय विभागांचे खासगीकरण बंद करण्यात यावे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे.
शिक्षण क्षेत्रातील विना अनुदान धोरण धोरण रद्द करण्यात यावे. शिक्षक, महसूल, कंत्राटी कामगार, आरोग्य विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका आदी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या तातडीने निकाली काढण्यात याव्या आदी मागण्या या देशव्यापी संप आणि मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्त्व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे हरिषचंद्र लोखंडे, विनोद भालतडक, ओंकार धावडे, बाळासाहेब भोयर, संजय मानेकर, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)चे यशवंत झाडे, प्रदीप दाते, शिक्षक संघटनेचे अजय भोयर, दिलीप उटाणे यांनी केले.
मोर्चात मोठ्या संख्येने विविध विभागातील शासकीय-निमशासकीय तसेच कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.
केंद्राच्या धोरणांचा नोंदविला निषेध
कामगारांचा मोर्चा : उपविभागीय महसूल अधिकाºयांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवून त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप करून कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ बुधवारी शहरातून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा उपविभागीय महसूल कार्यालयात परिसरात येताच एसडीओ चंद्रभान खंडाईत यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्त्व कामगार नेते अॅड. सुधीर कोठारी, इंटकचे महासचिव आफताब खान यांनी केले. कामगारांच्या मागण्या तातडीने निकाली काढा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
इंटकच्या कार्यालय परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. मोर्चात शिक्षक संघटना, बँक असोसिएशन व विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विठोबा चौक, मोहता चौक, कारंजा चौक मार्गक्रमण करून मोर्चाने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर आंदोलनकत्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर केले. निवेदन देताना अॅड. सुधीर कोठारी, आफताब खान, प्रवीण चौधरी, राजू दीक्षित, नाना हेडाऊ, वहिद खान, डेकाटे, विलास ढोबळे, रवी गोडसेलवार, दीपक फरदे, एकनाथ डेकाटे, विलास बोडे, गजू डोंगरे, दिगंबर नवघरे, बंडू काटवले, प्रभाकर देवतळे, संतोष माथनकर, जीवन दलाल, दिलीप, गजू धात्रक आदींची उपस्थिती होती.
मोर्चा एसडीओ कार्यालय परिसरात पोलिसांनी थांबविल्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. यावेळी विविध मान्यवरांसह कामगार नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. सदर आंदोलनात गिरणी कामगारही सहभागी झाले होते.