अभियांत्रिकीच्या जागा यंदाही रिक्तच प्रवेशाचे निकष बदलले
By admin | Published: May 11, 2014 12:30 AM2014-05-11T00:30:49+5:302014-05-11T00:30:49+5:30
अभियांत्रिकीच्या प्रवेश पात्रतेचे निकष बदलण्यात आले असल्याने याचा परिणाम महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेशावर होणार आहे.
गुणांची टक्केवारी वाढली
वर्धा : अभियांत्रिकीच्या प्रवेश पात्रतेचे निकष बदलण्यात आले असल्याने याचा परिणाम महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेशावर होणार आहे. पीसीएम गटात ४५ टक्के गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांलाही अभियांत्रिकीकरिता प्रवेश दिला जात होता; मात्र राज्य शासनाने यात पुन्हा बदल करून जूनाच ५० टक्क्यांचा पात्रता निकष पुन्हा लागू केला आहे. परिणामी पूर्वीच रिक्त जागांची काळजी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांवर या निर्णयाने काळजीत अधिक भरच पडली आहे. याबाबत वृत्त असे की, बारावी विज्ञान शाखेतील अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाकडे जाणार्या विद्यार्थ्यांकरिता तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांनी पात्रता निकष तयार केले आहे. यानुसार प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. यासोबत भौतिकशास्त्र, गणित अनिवार्य विषय व त्याबरोबर रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, व्होकेशनल यापैकी एक विषय असे तीन विषयाचे एकत्रित गुण असे किमान ५० टक्के प्राप्त करणे अनिवार्य होते. मागासवर्गीय व अपंग उमेदवारांसाठी हाच निकष ४५ टक्के होता; मात्र गत काही वर्षांपासून अभियांत्रिकीत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. प्रवेशासंबंधी अडचणींवर विचार करून पात्रतेचे निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी पीसीएम गटात ४५ टक्के गुणांवर अभियांत्रिकीत प्रवेश दिला जात होता. मागासवर्गीयांकरिता ही टक्केवारी ४० वर आली होती. यात पुन्हा ५ टक्क्याने वाढ केली असल्याने जूनाच निकष राज्यात लागू झाला आहे. या सत्रातील इयत्ता बारावी उत्तीर्ण करणार्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पीसीएम ग्रुपमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य होणार आहे. या टक्केवारीतील फरकाचा परिणाम रिक्त जागांवर होणार असल्याचे दिसून येते. कारण ४५ टक्के हा पात्रता निकष असतानाही अभियांत्रिकी महाविद्यालयातील जागा रिक्त असायच्या. आता तर निकष वाढविल्याने विद्यार्थ्यांचा तुटवडा जाणवणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांची पाठ अभियांत्रिकीकडे वळणार्या विद्यार्थ्यांचा ओघ काही अंशी कमी झाला. महाविद्यालयातील रिक्त जागा हा त्याचाच दाखला आहे. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना पूर्वी हमखास रोजगार मिळत होता; मात्र औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे रोजगार कमी झाला. शिवाय महाविद्यालयांची संख्या वाढल्याने हा परिणाम जाणवतो.