आपत्तीकाळात शुल्कवाढीऐवजी श्रेष्ठतम शिक्षणावर भर; महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:37 PM2020-08-18T12:37:34+5:302020-08-18T12:39:17+5:30
शुल्कवाढ न करता देशातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्वस्त आणि श्रेष्ठतम शिक्षण दिले जाईल, असे मत हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड काळामध्ये सर्वच घटकांवर विपरित परिणाम झाला आहे. यातून शिक्षण क्षेत्रही सुटलेले नाही पण, समाजाच्या अगदी शेवटच्या घटकातील विद्यार्थ्याला श्रेष्ठतम शिक्षण मिळावे, हा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा उद्देश आहे. म्हणूनच शुल्कवाढ न करता देशातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्वस्त आणि श्रेष्ठतम शिक्षण दिले जाईल, असे मत हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.
हिंदी विश्वविद्यालयाच्या सभागृहात पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू हनुमानप्रसाद शुक्ल, प्र-कुलगुुरू चंद्रकांत रागीट व कुलसचिव कादर नवाज खान आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण देणारे हिंदी विश्व विद्यालय हे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करून अध्ययन-अध्यापनाला कधीच सुरुवात झाली आहे. यावर्षी ३०० जागांकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तब्बल नऊ देशांतील विद्यार्थ्यांनी संपर्क साधून प्रवेशाकरिता इच्छा व्यक्त केली आहे.
या विद्यापीठात पदवी, पदव्युत्तरच्या विविध अभ्यासक्रमासोबतच महात्मा गांधी यांचे विचार देशपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोविड काळामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू असून ऑक्टोबर महिन्यापासून अध्यापनाचे कार्य सुरू केले जाणार आहे. परीक्षा न घेता उत्तीर्ण केल्यास मिळालेल्या ‘कोविड’ गुणपत्रिकेमुळे विद्यार्थ्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे परीक्षा घेऊनच त्याच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र दिले जाईल, असेही कुलगुरू प्रा. रजनीश शुक्ल यांनी सांगितले.
ऑनलाईन समुपदेशनाची केंद्राने घेतली दखल
हिंदी विश्व विद्यालयामध्ये विविध देशातील विद्यार्थी शिक्षणाकरिता येतात. या लॉकडाऊन काळामध्ये ३७० विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये होते. त्यांना सुरक्षित ठेवून त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. अद्याप ७० ते ८० विद्यार्थी वास्तव्यास असून सुरक्षित आहेत. या कालावधीत मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्ती केली. त्यांनी विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांचेही ऑनलाईन समुपदेशन केले. याचीच दखल घेत केंद्र सरकारने केंद्रीय समुपदेशन केंद्र स्थापन करून येथीलच मानसोपचारतज्ज्ञांची निवड केली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
विद्यार्थी बेकार होणार नाही
नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी बेकार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्याचा एका वर्षाचा प्रश्न नसतो, तर आयुष्याचा असतो, त्यामुळे परिस्थितीमुळे त्याने पहिले वर्ष पूर्ण करून शिक्षण सोडले तर त्याला डिप्लोमा दिला जाईल. पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ त्याने शिल्लक राहिलेले शिक्षण पूर्ण केल्यास तो आपली पदवी पूर्ण करू शकणार आहे. परिस्थिती किंवा अडचणीमुळे विद्यार्थी बेकार होणार नाही. या विश्व विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चार पैसे मिळावे म्हणून ‘कमवा आणि शिका’ ही योजना राबविली जात आहे. यामध्ये गेल्यावर्षी ५६ टक्के विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याने त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावरही भर असल्याचे कुलगुुरूंनी सांगितले.