वर्ध्यात कोविड मृत्यू नियंत्रणासाठी चाचणीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 03:44 PM2020-08-25T15:44:35+5:302020-08-25T15:45:38+5:30
वर्धा जिल्ह्यात एकूण २२ हजार ५२३ व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसूत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मागील काही महिन्यांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाची एन्ट्री झाली असून कोविड मृत्यू नियंत्रणासाठी कोरोना चाचणीवर भर दिला जात आहे. आतापर्यंत आरटीपीसीआर आणि अॅन्टिजेन या दोन पद्धतींचा अवलंब करून जिल्ह्यात एकूण २२ हजार ५२३ व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे. या कोविड चाचणी केलेल्यांमध्ये जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचाही समावेश आहे.
शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळता येतो, हे लक्षात आल्यावर आरोग्य विभाग पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अॅन्टिजेन किटद्वारे ६ हजार १२१ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी २८१ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह तर ५ हजार ८४० व्यक्तींचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. तर १६ हजार ४०२ व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७८२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तसेच १५ हजार ६२० व्यक्तींचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे.