तान्हा पोळ्याला कर्मचारी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 09:40 PM2017-08-22T21:40:30+5:302017-08-22T21:41:08+5:30
विदर्भात तान्ह्या पोळ्याला महत्त्व असले तरी यंदाच्या वर्षात या पोळ्याच्या दिवशी वर्धेत शासकीय कार्यालयांना सुट्टी नव्हती. असे असताना मंगळवारी येथील जीवन प्राधिकरणला सुट्टी असल्याचे जाणवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भात तान्ह्या पोळ्याला महत्त्व असले तरी यंदाच्या वर्षात या पोळ्याच्या दिवशी वर्धेत शासकीय कार्यालयांना सुट्टी नव्हती. असे असताना मंगळवारी येथील जीवन प्राधिकरणला सुट्टी असल्याचे जाणवले. इतर कार्यालयात कर्मचारी कामात असताना या कार्यालयात कर्मचाºयांच्या टेबल खुर्च्यांना पंखे हवा आणि दिवे प्रकाश देत होते. यामुळे येणारा व्यक्ती कर्मचारी तान्हा पोळ्यात गेले, असे बोलून परत जात असल्याचे चित्र दिसून आले.
शासकीय कर्मचाºयांना सुट्ट्यांची कमतरता नाही. शनिवार, रविवारसह प्रत्येक लहान-मोठ्या सणाची सुटी असते. शासकीय सुट्टी नसली तर काही सुट्या ‘कलेक्टर डिक्लीयर’ असतात. यंदा आॅगस्ट महिन्यात बरेच सण आहेत. गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्य दिन या सुट्ट्या एकत्र आल्या तर पोळ्यासाठी यंदा जिल्हाधिकाºयांनीही पोळ्याची सुट्टी जाहीर केली नाही. असे असले तरी मंगळवारी शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. तीन ते चार कर्मचारी आपापली कामे करीत असल्याचे बघावयास मिळाले; पण उर्वरित सर्व खोल्या निर्मनुष्य होत्या. या कार्यालयातील शिपायाने पंखे आणि लाईट मात्र सर्वच खोल्यांतील सुरू करून ठेवल्याचे पाहावयास मिळाले. जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता वाघ हे न्यायालयीन कामानिमित्त नागपूर येथे असल्याची माहिती मिळाली. बहुदा यामुळेच कर्मचाºयांनीही कार्यालयाला बुट्टीच मारल्याचे दिसून आले.
उर्वरित कामाच्या दिवसांतही या कार्यालयामध्ये असाच प्रकार पाहावयास मिळतो. जीवन प्राधिकरणमध्ये कार्यरत बहुतांश कर्मचारी ये-जा करतात. यामुळे हे कार्यालय दुपारी ४ वाजताच्या नंतर रितेच दिसून येते. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांना त्यांची कामे कोणत्या वेळेत करून घ्यावीत, असा प्रश्न पडतो. मंगळवारी काही नागरिक जीवन प्राधिकरणमध्ये सदोष मिटरबाबत तक्रारी करण्यासाठी तथा ते बदलून घेण्याकरिता आले होते; पण जबाबदार अधिकारी नसल्याने तथा कर्मचारीही नसल्याने त्यांना बराच वेळ ताटकळावे लागले.
शासकीय कार्यालयात विजेचा अपव्यय
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये सुमारे ५० ते ६० कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाºयांसाठी पंखे, लाईटची पुरेशी व्यवस्था आहे; पण दप्तर दिरंगाईमुळे येथेच सर्वाधिक विजेचा अपव्यय होत असल्याचे पाहावयास मिळाले. मंगळवारी कार्यालयात केवळ एकाच खोलीमध्ये तीन ते चार कर्मचारी असताना उर्वरित तीन ते चार खोल्यांमधील पंखे व लाईट सुरू होते. वीज ग्राहकांना विजेची बचत करण्याचा सल्ला दिला जातो; पण शासकीय कार्यालयातील विजेचा अपव्यय कोण रोखणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मी सध्या न्यायालयीन कामानिमित्त नागपूर येथील न्यायालयात आहे. आज सुटी नाही. कर्मचारी कार्यालयात राहायला हवेत. आमच्याकडे एक विभाग व दोन उपविभाग आहे. याबाबत माहिती घेतो.
- डी.एस. वाघ, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, वर्धा.