चूक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याची; फटका विद्यार्थ्याला
By admin | Published: June 25, 2017 12:32 AM2017-06-25T00:32:48+5:302017-06-25T00:32:48+5:30
आरोग्य विभागाने जन्माची नोंद घेताना केलेली गफलत विद्यार्थ्याच्या अंगलट आली आहे. पुरूष असताना नोंद स्त्री-लिंग अशी करण्यात आली.
जन्म तारखेतही घोळ : पुरूष ऐवजी केले स्त्री
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : आरोग्य विभागाने जन्माची नोंद घेताना केलेली गफलत विद्यार्थ्याच्या अंगलट आली आहे. पुरूष असताना नोंद स्त्री-लिंग अशी करण्यात आली. शिवाय ग्रा.पं. जन्म-मृत्यू नोट रजिस्टर व शाळा दाखल -खारीज रजिस्टरच्या जन्म नोंदीत तफावत आहे. यामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यास अडचण झाल्याने त्याची फरफट होत आहे.
भटक्या-विमुक्त जमातीतील गोसावी समाजाचे मुलचंद धांदू हे निरक्षर असले तरी आपल्या मुलाने शिकावे, अशी त्यांची इच्छा आहे. मुलगा राज हा यंदा दहावी उत्तीर्ण झाला. यामुळे जात प्रमाणपत्राकरिता त्याने तहसील कार्यालयात अर्ज केला होता; पण अर्जासोबत जन्माची मूळ नोंद असलेला पुरावा न जोडल्याने प्रकरण परत आले. ग्रा.पं. कार्यालयात त्याने जन्माचा दाखला मिळावा म्हणून अर्ज केला. तेव्हा नोंदी तपासत असताना त्याच्या नावापुढे स्त्री-लिंग, अशी नोंद असल्याचे ग्रामसेवकाने सांगितले. हे ऐकताच विद्यार्थ्याच्या डोळयापुढे काजवे चमकू लागले. या चुका येथेच थांबल्या नाही तर जन्म तारखेतही घोळ झाल्याचे दिसून आले. शाळा दाखल रजिस्टरनुसार त्याचा जन्म २१ सप्टेंबर २००० तर ग्रा.पं. रेकॉर्ड नुसार ११ आॅक्टोबर २०१० आहे. ही घोडचुक आरोग्य उपकेंद्राची असो वा ग्रा.पं. कर्मचाऱ्यांची; पण मनस्ताप त्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला होत आहे. यावर उपाय मात्र कुणीच सांगत नसल्याने त्याची फरफट होत आहे. शिक्षण व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झालेली घोडचुक कशी दुरूस्त करता येईल, या दृष्टीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.