दौऱ्याच्या नावावर कर्मचारी गैरहजर
By admin | Published: April 26, 2017 12:24 AM2017-04-26T00:24:40+5:302017-04-26T00:24:40+5:30
येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सतत दौऱ्याच्या नावाखाली गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहे.
शेतकऱ्यांचे कृषी अधीक्षकांना निवेदन : कृषी कार्यालयातील प्रकार
आष्टी (शहीद): येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सतत दौऱ्याच्या नावाखाली गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहे. सुट्या नसताना एवढे कर्मचारी कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे.
येथील तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी हे दोन्ही पद गत वर्षभरापासून रिक्त आहे. सद्या दोन्ही पदांचा कारभार कृषी पर्यवेक्षक प्रमोद पेठकर पाहत आहे. त्यांना मिटींग व आढावा सभा यासाठी वारंवार वर्धा, नागपूर येथे जावे लागत असल्याने कार्यालय वाऱ्यावर राहते. कर्मचारी व कृषी सहाय्यक ही मंडळी याच संधीचा फायदा घेत गायब होतात. कार्यालयात शेतकरी आल्यावर त्यांना कर्मचारी व अधिकारी नसल्याने परत जावे लागते. महिनाभरावर खरीप हंगाम येवून पडला आहे. त्यामुळे शेतकरी विविध समस्या घेवून तालुकास्थळी येतात त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृषी विभागाला वेळ नाही असे चित्र दिसत आहे.
आष्टी तालुक्यात मागील काही वर्षाआधी शेताच्या बांधावर झालेली कामे पावसाने वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचतात, बंधारा फुटल्यामुळे साहुर, माणीकवाडा, तारासावंगा मौजात जमीन पडीत राहत आहे.
याप्रकरणी परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या, तरी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. खडकी, भारसवाडा, चिस्तुर या मौजातील शेतकऱ्यांनी शेतीच्या केलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखविल्या जात आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आष्टी तालुक्याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. नियमित तालुका कृषी अधिकारी असल्यास कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा शेतकऱ्याची आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)
आष्टी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने सतत खाली राहते. याप्रकरणी सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागणार व कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविणार.
-अरुण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी, आष्टी (श)