जुनी पेन्शन योजना : संपकऱ्यांनी भारुडातून मारला शासनाला डंख; भजन, गीतांनी वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 11:21 AM2023-03-18T11:21:14+5:302023-03-18T11:22:18+5:30
चौथ्या दिवशीही उत्साह कायम
वर्धा : ‘अरं रं रं...विंचू चावला... एनपीएसचा विंचू चावला... काय मी करू विंचू चावला...’ असे भारुड म्हणत संपकऱ्यांनी अनेकांचे लक्षवेधत शासनाला चांगलाच डंख मारला. यावेळी अनेक भजने, गीत सादर करून आंदोलकांमध्ये स्फूर्ती भरण्यात आली. त्यामुळे आज चौथ्या दिवशीही संपकऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचे दिवसभर ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आज कर्मचाऱ्यांचे कलागुण अनुभवायला मिळाले. संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी विविध स्फूर्ती गीत व जनजागृती गीत सादर करून आंदोलनस्थळी उत्साह वाढविला. यावेळी ढोलकी, डफडीच्या साथीने टाळ्यांचा कडकडाट करून कर्मचाऱ्यांनी ठेकाही धरला. यात पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनेच महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. आपल्या भारुड, भजन व गीताच्या माध्यमातून ‘एकच मिशन जुनी पेन्शन’चा नारा बुलंद करण्यात आला. यासर्व कार्यक्रमांमुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत आंदोलकांची चांगलीच गर्दी होती.
संपात वाढतोय कर्मचाऱ्यांचा सहभाग
जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी १४ मार्चपासून संपावर गेले आहेत. वर्ध्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह इतरही तालुक्यामध्ये ठिय्या आंदोलन करीत आहे. गेल्या तीन दिवसांचा अंदाज घेतला असता कर्मचाऱ्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढतच आहे. या संपात ७० संघटनांचा सहभाग असून आज वर्ध्यात जवळपास ११ हजार कर्मचारी उपस्थित होते. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार असल्याचे अध्यक्ष हरिशचंद्र लोखंडे यांनी सांगितले.