नगरपालिकेत कर्मचारी व नगरसेवक आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:23 PM2019-05-17T22:23:09+5:302019-05-17T22:23:29+5:30
नगरपालिकेत मागील कित्येक दिवसांपासून अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांमधील धुसपूस सुरु होती. अखेर उपाध्यक्षांकडून नगररचनाकाराला झालेल्या मारहाणीनंतर हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने आता अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक आमने-सामने उभे ठाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नगरपालिकेत मागील कित्येक दिवसांपासून अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांमधील धुसपूस सुरु होती. अखेर उपाध्यक्षांकडून नगररचनाकाराला झालेल्या मारहाणीनंतर हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने आता अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक आमने-सामने उभे ठाकले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले तर नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अधिकारी, कर्मचारी सन्मानजनक वागणूक देत नसल्याचा आरोप केला आहे.
शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न फार गंभीर असून याच कारणावरुन गुरुवारी पालिकेत गदारोळ झाला. यात नगरचनाकार शंतनू देवईकर यांनी उपाध्यक्ष प्रदिपसिंग ठाकुर यांच्याविरुद्ध तर ठाकूर यांनी देवईकर यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या मारहाणीमुळे पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारुन कारवाईची मागणी केली आहे. तर उपाध्यक्ष ठाकूर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नागरिकांनी समस्या सोडविण्याकरिता नगरसेवकांना निवडून दिले आहे. त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभागातील कामाविषयी सांगितले तर ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. तसेच हेके खोरीने वागून नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक देतात. असाच प्रकार गुरुवारी पालिकेत घडला. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर यांनी अधिकाºयांना अतिक्रमणाबाबत अहवाल मागितला असता सहाय्यक नगर रचनाकार यांनी उलटसूलट उत्तर देऊन उपाध्यक्षांशी अरेरावी केली. त्यानंतर लगेच शहर पोलीस स्टेशन गाठून उपाध्यक्षांविरुद्ध तक्रार नोंदवित कामबंद आंदोलन सुरु केले. हा नित्याचाच झाला आहे. त्यामुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांना सन्मानजनक वागणूक देऊन प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीचे वेळीच निराकरण करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. अपर जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन देताना उपाध्यक्ष ठाकूर, गटनेता निलेश खोंडे, सोनल ठाकरे, संदीप त्रिवेदी, नौशाद शेख, निलेश किटे, वंदना भुते, इंदू तलमले, रवींद्र गोसावी,राधा चावरे,रंजना पट्टेवार, कैलास राखडे, गुंजन मिसाळ, आशिष वैद्य, शैलेंद्र झाडे, शुभांगी कोलते, प्रतिभा बुरले, श्रेया देशमुख, प्रदीप ठाकरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.