निकालानंतरही कर्मचारी वेतनश्रेणीपासून वंचित
By admin | Published: April 7, 2017 02:06 AM2017-04-07T02:06:22+5:302017-04-07T02:06:22+5:30
नालवाडी येथील मूकबधीर विद्यालयात विशेष शिक्षक पदावर कार्यरत अशोक नागतोडे यांना १ एप्रिल २००० ते २४ जून २००१ या कालावधीत.....
टाळाटाळ : थकीत वेतनासाठी निव्वळ प्रतीक्षा
वर्धा : नालवाडी येथील मूकबधीर विद्यालयात विशेष शिक्षक पदावर कार्यरत अशोक नागतोडे यांना १ एप्रिल २००० ते २४ जून २००१ या कालावधीत विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त ठेवले होते. यामुळे त्यांनी संबंधित कालावधीची मान्यता व वेतन मिळावे म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर निकाल लागूनही त्यांना मान्यता व वेतन देण्यात आले नाही. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागतोडे यांच्या याचिकेवर नऊ वर्षांनी ९ जानेवारी रोजी न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती देशपांडे यांनी निर्वाळा दिला. यात प्रतिवादी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जि.प. समाज अधिकारी हे होते. यामुळे न्यायालयाने नागतोडे यांचे १ एप्रिल २००० ते २४ जून २००१ या कालावधीस सात्यत प्रदान करून सेवा नियमित करण्याचे आदेशात नमूद केले; पण न्यायालयाचा निकाल लागून दोन महिने लोटले असताना त्यांच्या उपरोक्त कालावधीच्या सेवेबाबत कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, ते वरिष्ठ वेतनश्रेणीस पात्र असताना वंचित आहेत. १२ फेबु्रवारी २०११ पासून वरिष्ठ वेतनश्रेणी व त्यातील थकीत वेतन अद्याप मिळाले नाही. शिवाय १ जानेवारी १९९७ ते ३१ डिसेंबर २००५ या पाचव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेणीमधील वार्षिक वेतनवाढ फरकदेखील अद्याप देण्यात आलेला नाही. ही दोन्ही प्रकरणे केवळ न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देत जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले. जि.प. समाज कल्याण अधिकाऱ्यांना न्यायालयाची प्रत देऊन त्वरित कार्यवाही करण्याची मागणी १० फेबु्रवारी रोजी नागतोडे यांनी निवेदनातून केली.
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही ४, १४ आणि ३१ मार्च रोजी निवेदने दिली; पण जि.प. समाज कल्याण अधिकारी व वैद्यकीय सामाजिक कार्यकत्याच्या वेळकाढू व आडमुठे धोरणामुळे अद्याप न्यायालयाच्या आदेशावर अंमल करण्यात आला नाही. परिणामी, नागतोडे यांना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)