कर्मचारी रजेवर, ‘झेडपी’त शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:52 PM2018-12-24T22:52:55+5:302018-12-24T22:54:17+5:30
सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेले काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहताही सुट्यांंच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही, याचा प्रत्यय सोमवारी जिल्हा परिषदेतील परिस्थितीवरून आला. येथील १८ विभागांतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी रजेवर असल्याने कामांचा चांगलाच खोळंबा झालेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेले काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहताही सुट्यांंच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही, याचा प्रत्यय सोमवारी जिल्हा परिषदेतील परिस्थितीवरून आला. येथील १८ विभागांतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी रजेवर असल्याने कामांचा चांगलाच खोळंबा झालेला होता. अनेकांना अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन घेऊन माघारी परतावे लागले.
जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री मानली जाते. मागील दोन ते तीन वर्षांपासून अधिकारी व कर्मचाºयांवर पदाधिकाºयांचा वचक राहिला नसल्याने ‘पदाधिकारी कमजोर तर अधिकारी शिरजोर’ असेच चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, बालक ल्याण विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, वित्त विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, निरंतर शिक्षण विभाग, सर्वशिक्षा अभियान, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा जलसंधारण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आदी १८ विभाग आहेत. यातील सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, बालकल्याण विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग अधिकाºयांच्या प्रवृत्तीसह इतर कारणांमुळे सदैव चर्चेत असतो. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने जिल्हा परिषद इमारतीत फेरफटका मारला असता अठराही विभागातील अर्धेअधिक अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. कार्यालयात उपस्थित असलेले बोटावर मोजण्याइतके अधिकारी व कर्मचारी आपल्याच विश्वात मग्न होते. काही गप्पांमध्ये तर काही मोबाईलवर व्यस्त असल्याचे दिसून आले. अनेक विभागात कुणी नसताना पंखे सुरूच हेते. रित्या खुर्च्यांना ते हवा देत होते. यात विजेची उधळपट्टी होताना दिसली. अधिकारी व कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना मात्र आल्यापावलीच परत जावे लागले.
लाँग विकेंडचा एन्जॉय
जिल्हा परिषदच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले बहुतांश अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता ये-जा करतात. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार उशीरा येणे आणि लवकर परत जाणे, हा प्रकार नित्याचाच झाला आहे. असे असतानाही सुट्या आल्या की त्याचे सोनं करण्याची संधी अधिकारी, कर्मचारी सोडत नाहीत. नुकताच चौथा शनिवार आल्याने शनिवारी सुटी होती. तसेच दुसऱ्या दिवशी रविवार आणि पुन्हा मंगळवारी नाताळाची सटी आल्याने बहुतांश अधिकाऱ्यांनी सोमवारचीही सुटी घेऊन लाँग विकेंडचा एन्जॉय केला. याविषयी माहिती जाणून घेतली असता काहींनी अर्ज न देताच दांडी मारल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे यावर आता वरिष्ठांकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
खरे काय, नि खोटे काय?
जिल्हा परिषदेतील अठराही विभागाला भेट दिली असता कार्यालयातील बहुतांश खुर्च्या रित्याच होत्या. तर उपस्थित कर्मचारी गप्पांमध्ये रंगलेले दिसून आले. त्यांना वरिष्ठांबाबत विचारले असता कुणी दौऱ्यावर, तर कुणी न्यायालयात गेल्याचे सांगितले. परंतु, याची शहानिशा करण्यासाठी काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी मी रजेवर असल्याची क बुली दिली. त्यामुळे यात खरे काय नि खोटे काय, हे चौकशीअंतीच कळेल. त्यामुळे रजेवर असेल तर त्यांचा अर्ज होता का? किती अधिकारी व कर्मचाºयांनी रितसर अर्ज सादर करून रजा घेतली, हेही तपासण्याची वेळ आली आहे.
माध्यमिक शिक्षण व कृषी विभाग वाऱ्यावर
माध्यमिक शिक्षण विभाग नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. आजही या कार्यालयात कार्यरत असलेल्या १७ कर्मचाऱ्यांपैकी केवळ तीनच कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. उर्वरित रजेवर असल्याचे सांगण्यात आले. एकाच दिवशी इतक्या कर्मचाऱ्यांना रजेवर जाता येते काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच कृषी विभागातही अशीच परिस्थिती दिसून आली. येथील तांत्रिक विभागातील संपूर्ण खुर्च्या खाली होत्या, तर कृषी विभागात चार-पाच महिला कर्मचारी उपस्थित होत्या. त्यामुळे हे दोन्ही विभाग आज वाºयावरच असल्याचे दिसून आले.
कर्मचाºयांच्या रजा मंजूर करण्याचे अधिकार संबंधित विभाग प्रमुखांकडे आहे. सध्या सलग सुट्या आल्यामुळे अधिकारी व कर्मचारी रजेवर गेले असावे, याबाबत माहिती घ्यावी लागेल.
-अजय गुल्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी. जि.प. वर्धा.