३४ महिन्यांच्या वेतनाकरिता कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By Admin | Published: July 15, 2016 02:29 AM2016-07-15T02:29:57+5:302016-07-15T02:29:57+5:30
येथील जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँकेतील कर्मचाऱ्यांना गत ३४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.
वर्धा जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेतील प्रकरण
वर्धा : येथील जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँकेतील कर्मचाऱ्यांना गत ३४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांच्याकडून गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
बँकेकडून आॅगस्ट २०१३ ते जून २०१६ पर्यंतचे एकूण ३४ महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांची बँकेत काम करण्याची मानसिकता नाही. ३४ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कुटुबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आर्थिक बाजू ढासळल्यामुळे दैनंदिन व्यवहार कसे करावे हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमक्ष उभा ठाकला आहे. परिवारातील व्यक्तीच्या आजारपणात औषधोपचाराचा सुद्धा करून शकत नाही. या सर्व बाबीचा शासन स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला; परंतु कर्मचाऱ्यांच्या या ३४ महिन्यांच्या पगाराबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती ढासळली असून बँकेत काम करण्याची मनस्थिती नाही. यामुळे पगार मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असल्याचे माहितीपत्रकातून कळविले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)