४० दुकानदारांवर रोजगाराचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 11:59 PM2018-09-18T23:59:18+5:302018-09-19T00:00:12+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ चे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे सेलू तालुक्यातील खडकी येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील ४० दुकानदारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ चे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे सेलू तालुक्यातील खडकी येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील ४० दुकानदारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सदर रस्ता काम करण्याची भूमिका महामार्ग बांधणी प्रशासनाने घेतली असल्याने हे दुकानदार अडचणीत आले आहे.
खडकी येथे मागील २५ वर्षांपासून हनुमान मंदिर परिसरात हॉटेल, चहा टपरी, पानठेला व विविध लहान दुकाने लावून आपल्या कुटूंबांचा उदरनिर्वाह ४० लोक करीत होते. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ बुट्टीबोरी ते औरंगाबाद रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या परिसरातील हे दुकान हटविले जाणार आहे. सदर दुकाने हे शेतजमिनीच्या जागेवर शेतमालकांकडून भाडेतत्वावर जागा घेवून चालविण्यात येत होते. या शेताच्या जागेचा मोबदला शेतमालकाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे. मात्र गेल्या २५ वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या या लोकांना कुठलाही मोबदला देण्यात आलेला नाही. आमचे पुनर्वसन गावठाणाच्या जागेवर करून द्या, अशी मागणी या व्यवसायिकांनी केली आहे. ग्रामपंचायत खडकी आमगावच्या सरपंच व सचिवाकडे याबाबत निवेदनही ४० व्यवसायिकांनी दिलेले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महामार्गाचे काम होणार असल्याने आमच्या पोटापाण्याचा व्यवसाय जाणार आहे, त्यामुळे आम्हाला खडकी आमगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंदिरसमोरील उत्तरेकडील शेत सर्व्हे नं. १३/१ या ठिकाणी गावठाणावर पुनर्वसन करण्यात यावे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीने ठराव करून पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. परंतु याबाबत काहीही हालचाल करण्यात आलेली नाही, अशी माहिती या व्यवसायिकांनी दिली.
आमदारांनी दिले नितीन गडकरींना पत्र
बुट्टीबोरी ते औरंगाबाद या महामार्गाचे रुंदीकरण होत असल्याने खडकी येथील व्यवसायिकांचा व्यवसाय बंद होणार आहे. त्यामुळे या नागरिकांना रस्त्याच्या दक्षिणेकडील शेतात गावठाण व व्यवसायाकरिता जागा देण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्र देवून केली आहे.
आमच्या वडिलोपार्जीत जागेवर ४० वर्षांपासून व्यवसाय करण्यात येत आहे. यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. सदर व्यवसाय हा रस्त्यालगत असल्याने तो रस्त्याच्या कामामुळे बंद होणार आहे. त्यामुळे दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. त्यामुळे पुनर्वसन करून देण्यात यावे.
- इकबाल खान, व्यावसायिक, खडकी-आमगाव.