शेतकरी व ग्रामीण कारागिरांचे सशक्तीकरण आवश्यक
By admin | Published: April 5, 2017 12:36 AM2017-04-05T00:36:06+5:302017-04-05T00:36:06+5:30
भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीवर आधारित सर्व उद्योग ग्रामीण भागात होते.
अभिमन्यू भारतीय : खादी व ग्रामोद्योगाच्या प्रचाराबाबत चर्चा
सेवाग्राम : भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीवर आधारित सर्व उद्योग ग्रामीण भागात होते. यामुळे शेतकरी सर्वत्र समृद्ध व आनंददायी जीवन जगत होते. शेतकरी व ग्रामीण भाग सुखी तर राष्ट्र सुखी; पण कालांतराने शासन व राजकीय स्तरावर धोरण बदलले. शेती, शेतकरी व ग्रामीण उद्योगांची पिछेहाट झाली. औद्योगिक धोरणामुळे शेती व ग्रामोद्योग लयास गेले. शेतकरी व ग्रामीण कारागिरांच्या सशक्तीकरणाची वेळ आली. यामुळे प्रत्येकाने खादी व ग्रामद्योगांच्या वस्तूंचा आग्रह धरल्यास ग्रामीण भागाला सुगीचे दिवस येतील, असा विश्वास ‘लोकमत’शी संवाद साधताना अभिमन्यू भारतीय यांनी व्यक्त केला.
स्वराज्य अभियानचे कार्यकर्ता असलेले अभिमन्यू शाळा, महाविद्यालयात खादी व ग्रामोद्योगाचा प्रचार, प्रसार करीत आहे. रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी युवकांना प्रोत्साहन देत आहेत. नई तालीम येथे आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. भारतीय म्हणाले की, देशातील अन्नदाता आर्थिक संकटात सापडला आहे. यातूनच निर्माण विषम अवस्थेमुळे आत्महत्या होत आहे. ग्रामीण रोजगाराची परिस्थितीही गंभीर आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात २० कोटी लोकांना सर्व क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. स्वयंचलित यंत्रामुळे रोजगार कमी व बेरोजगारांची संख्या वाढत आहे. यातून राष्ट्रघातक परिस्थिती निर्माण व्हायला लागली. याचे धोके आता शासन व नागरिकांनी ओळखले पाहिजे.
मोठी लोकसंख्या, सर्वात मोठी लोकशाही व कृषीप्रधान देशात खादी व ग्रामोद्योगाला चालना दिली तर रोजगाराचा प्रश्न काही अंशी मिटेल. एवढेच नव्हे तर कापूस ते कपडा या उपक्रमाला यश मिळेल. शेतकऱ्यांनी सूतकताई व छोट्या कापड विणणाऱ्या यंत्राचा उपयोग करावा. यामुळे आत्मनिर्भर होऊन बाजार व्यवस्थेचा धोका टळेल. संपूर्ण परिवार सहभागी असल्याने सुखी, पारिवारिक जीवन जगता करता येईल, असेही अभिमन्यू यांनी सांगितले. या उपक्रमावर १० मिनीटाचा माहितीपटही तयार करण्यात आलेला आहे. २०१८ मध्ये गांधीजींची १५० वी जयंती असल्याने हा उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही अभिमन्यू यांनी सांगितले.(वार्ताहर)