महिला कक्ष बंद होईल तो दिवस स्त्री सशक्तीकरणाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:44 AM2017-09-30T00:44:24+5:302017-09-30T00:44:35+5:30
आज आपण २१ व्या शतकात आहोत. अनेक युगे बदलली. अनेक परिवर्तने व स्थित्यंतरे झालीत. परंतु भारतामध्ये आजही स्त्री-पुरूष समानता या विषयावर चर्चा करावी लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आज आपण २१ व्या शतकात आहोत. अनेक युगे बदलली. अनेक परिवर्तने व स्थित्यंतरे झालीत. परंतु भारतामध्ये आजही स्त्री-पुरूष समानता या विषयावर चर्चा करावी लागते. स्त्रीच्या अस्तित्वाचा, सक्षमीकरणाचा विचार करावा लागतो. ज्या दिवशी स्त्री-पुरुष हा भेद संपुष्टात येईल व अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबून महिला कक्ष बंद होतील तो दिवस खºया अर्थाने सशक्तीकरणाचा राहिल, असे प्रतिपादन नागपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक सना पंडित यांनी केले.
स्थानिक लोक महाविद्यालयात महिला कक्ष, महिला अध्ययन व सेवा केंद्र तसेच महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोग वर्धा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्त्री-पुरूष समानता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रा. डॉ. गजानन कोटेवार तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश भोयर, प्राचार्य डॉ. विनाश साहुरकर, महिला कक्षाच्या प्रा.डॉ. सुचित्रा पाटणे, डॉ. सरिता गणराज आदींची उपस्थिती होती. .
सना पंडित पुढे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आदी सक्षम स्त्रियांचे उदाहरण सध्याच्या स्त्रीने डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. कौटंूबिक हिंसाचारात भारत वरच्या क्रमांकावर आहे. स्त्रियांवर सतत अत्याचार होत आहेत. कुठे गेली स्त्री शक्ती? अजून किती अत्याचार आपण सहन करणार? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.
भावनेच्या भरात स्त्री नको त्या गोष्टी करतात. राणी लक्ष्मीबाईने सैनिकांची फौज उभी केली होती. पण आपण स्त्रिया एकत्र येत नाहीत. समजाने सुद्धा स्त्रीला स्त्री चा खरा दर्जा न देता कायमची माता बनविली आहे. प्रत्येक स्त्रीने स्वत:चे व्यक्तिमत्व असे घडवा की, आपल्याला फॅशनची गरजच पडणार नाही. नकारही देता आला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कक्ष प्रमुख डॉ. सुचित्रा पाटणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा ठाकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महिला लोक आयोगाच्या नंदिनी बर्वे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. सोनाली बन्सोड, प्रा. सुरकार, प्रा. सुनील पाटणे यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणाच्या जोरावर स्त्रीने भरारी घ्यावी - कोटेवार
शिक्षण हे महत्त्वाचे आहे. शिक्षणाअभावी महिला पूर्वी चुल आणि मुल पर्यंत सीमित होत्या. सध्या शिक्षणाचे दालन महिलांसाठीही उघडे आहे. विविध प्रकारचे शिक्षण घेऊन महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन डॉ. कोटेवार यांनी केले.