वनविभागाच्या जागेवर शेकडो नागरिकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:38 PM2018-01-22T22:38:01+5:302018-01-22T22:38:35+5:30

बोरगाव (मेघे) लगतच्या चितोडा मार्गावर वनविभागाच्या जागेवर नागरिकांनी अवैधरित्या अतिक्रमण केले आहे.

En encroachment of hundreds of civilians in forest area | वनविभागाच्या जागेवर शेकडो नागरिकांचे अतिक्रमण

वनविभागाच्या जागेवर शेकडो नागरिकांचे अतिक्रमण

googlenewsNext
ठळक मुद्देमंत्र्यांकडे तक्रार : कारवाई होत नसल्याने नागरिकात असंतोष

आॅनलाईन लोकमत
वर्धा : बोरगाव (मेघे) लगतच्या चितोडा मार्गावर वनविभागाच्या जागेवर नागरिकांनी अवैधरित्या अतिक्रमण केले आहे. मोठ्या प्रमाणात होत असताना वन अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. या अतिक्रमणामुळे चितोडा गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत राज्याचे वनमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात वनविभाग आता काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बोरगाव (मेघे) ग्रा.पं. अंतर्गत चितोडा रस्त्यावर वनविभागाची जमीन आहे. या जमिनीवरील सर्व्हे क्र. ६५/१ व ६५/२, ६६, ७२, १८७ वर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत स्थानिक वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला अनेकदा नागरिकांनी माहिती दिली; पण कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण झाल्यास ते काढण्याचे अधिकार वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. ते पोलीस प्रशासनाची मदत घेत आपल्या जागा मोकळ्या करून घेऊ शकतात; पण बोरगाव येथील या प्रकरणाकडे वनविभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
या परिसराला भेट देऊन माहिती घेतली असता अनेक नागरिकांनी बांबूच्या ताट्या आणून येथे झोपड्या उभारण्याचे काम सुरू केले आहे. दररोज शेकडो नागरिक वन जमीन साफ करून तेथे आपली जागा राखून ठेवत आहेत. या सर्व अवैध प्रकाराकडे वनाधिकाºयांचे दुर्लक्ष आहे. यामुळे संतप्त झालेल्या चितोडा परिसरातील नागरिकांनी २ मार्च २०१७ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री, वनमंत्री व ग्रामीण विकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वनविभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे आता ८ जानेवारी २०१८ रोजी पुन्हा ६० लोकांनी सामूहिकरित्या अतिक्रमण केले आहे. दररोज येथे जागेच्या वादातून नागरिकांमध्ये कलह निर्माण होत आहे. यामुळे या परिसरातील शांतता व सुव्यवस्थाही धोक्यात आली आहे. वनविभाग गप्प का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. बोरगाव (मेघे) ते चितोडा हा रस्ता या अतिक्रमणामुळे अत्यंत अरूंद झाला आहे. ८० फुटाचा रस्ता आता ८ फुट राहिला आहे. यामुळे चितोडा येथील नागरिकांना वहिवाटीलाही अडचण निर्माण झाली आहे. याकडे वनमंत्र्यांनी लक्ष देत अतिक्रमण हटवावे, अशी मागणी चितोडाच्या नागरिकांनी केली आहे.
जागेच्या वादातून दररोज होतात भांडणे
बोरगाव (मेघे) ते चितोडा मार्गावर अतिक्रमण करण्यात येत आहे. नागरिक दररोज आपल्या झोपड्या लावून जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी, आपसांतच त्यांचे भांडणे होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथील शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. हा प्रकार टाळण्याकरिता वन विभाग, महसूल विभाग तथा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवित सदर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे.

चितोडा मार्गावरील अतिक्रमण सर्व्हे क्र. ६७ मध्ये झालेले आहे. सदर परिसराची पाहणी केली असून ती जागा महसूल विभागाची आहे. वन विभागाची जमीन नसल्याने आम्हाला कार्यवाही करता येत नाही. याबाबत वनमंत्री, उपवनसंरक्षक तथा जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना अहवाल पाठविला आहे.
- एस.एस. बन्सोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, वर्धा.

Web Title: En encroachment of hundreds of civilians in forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.