अतिक्रमण उठले जीवावर; अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:03 IST2025-01-17T18:02:13+5:302025-01-17T18:03:07+5:30
महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह : नागरिकांमधून व्यक्त होतोय रोष

Encroachment has become a threat to life; Traffic chaos due to increased encroachment
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. या महामार्गावर येत असलेले मंदिर मोठ्या तातडीने हलविण्यात आले; परंतु इतर अतिक्रमणाकडे महामार्ग प्रशासनाने लक्ष गेले नाही. यातून वाहतूककोंडी नित्याचीच झाली असून अपघात वाढले आहे.
शहरात अतिक्रमाची समस्या नागरिका सोबतच अधिकाऱ्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. अतिक्रमामुळे शहरातील वाहतूक प्रभावित होत असुन नागरिकांना छोट्या मार्गातून वाहन चालवावे लागत आहे. परंतू याकडे वाहतूक पोलिस याकडे लक्ष देण्यास तयार नाही. अतिक्रमामुळे या मार्गावर काहींना जीवही गमवावा लागल्याने या महामार्गाचे काम कधी पूर्णत्वास जाणार? असा प्रश्नही संतप्त आर्वीकर विचारत आहेत. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या काळात या महामार्गाचे काम तातडीने व्हावे, याकरिता संघर्ष समिती गठित करण्यात आली होती. त्यानंतर या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. निवडणूक आटोपली आणि कामही बंद पडले. पुन्हा विधानसभेच्या तोंडावर थातूरमातूर कामे सुरू केली. याही निवडणुकीनंतर कामाची गंती संथ झाल्याने हे काम नियमानुसार पूर्णत्वास जाणार की नाही, त्यामुळे नागरिकांना आणखी काही वाट बघावी लागणार असे संकेत प्रशासनाकडून दिसत आहेत.
नागरिक म्हणतात, आम्ही न्याय मागावा कुणाकडं?
या महामार्गाच्या कामामुळे आणखी किती दिवस त्रास सोसावा लागणार आहे. अपघातात निष्पापांचा जीव जात असून आम्ही आता न्याय कुणाकडं मागावा? हा प्रश्नच आहे. लोकप्रतिनिधींच्या गळ्यात विजयाचा हार पडला की, गावाशी प्रेम आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. सात वर्षांपासूनच सुरू असलेला हा त्रास कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कंत्राटदाराला किंवा महामार्ग प्रशासनाला ठणकावून सांगायला नको का, असा प्रश्नही पंकज गोडबोले व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सुलेमान यांनी उपस्थित केला आहे.
७ वर्षे लोटूनही महामार्गाची परिस्थिती जैसे थेच...
या अतिक्रमासंदर्भता गेल्या सात वर्षापासून शहरातील नागरिक संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना निवेदन दिल्या जात आहेत. मात्र, यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही
संघर्ष समिती काय करते?
शहरातून जाणारा हा एकमेव महत्त्वाचा व मोठा मार्ग आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, बसस्थानक व शासकीय कार्यालयात जाण्यासाठी हाच मार्ग असून या मार्गावर चांगलीच वर्दळ असते. त्यामुळे या महामार्गाचे काम तातडीने आणि नियमात पूर्ण होण्यासाठी संघर्ष समिती स्थापित करण्यात आली होती; पण हे काम रेंगाळले असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याने आता ती समिती काय करते? त्यांनी पुढाकार घेऊन काम तडीस न्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गुणवंत गुल्हाणे यांनी केली आहे.
"एखाद्या व्यक्तीचा रोडवर अपघात होतो त्या व्यक्तीचे दुःख त्यालाच कळते. जेव्हा अपघातग्रस्त रुग्ण येतात तेव्हा त्यांच्या घरच्यांचा जीव जागेवर राहत नाही. या रुग्णाला वाचविण्यात यश आलं तर त्याला इतर दुखापतींचा सामना करावा लागतो. किंवा अपंगत्व आल्यास आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यासारखं होतं. त्यामुळे हा चारपदरी मार्ग तातडीने व्हावा, हीच अपेक्षा आहे."
- डॉ. रोशन जवळेकर, वैद्यकीय तज्ज्ञ
"शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम नियमानुसार होत आहे का? यात शंकाच निर्माण होत आहे. ज्या तत्परतेने धार्मिकस्थळांचे पुनर्वसन केले, त्या तत्परतेने अतिक्रमण काढले त्या तत्परतने या रस्त्याचे काम नियमानुसार होणार का? अतिक्रमणाला हात न लावता रस्त्याची रुंदी तर कमी करणार नाही, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे."
- सुधीर जाचक, सामाजिक कार्यकर्ता
"माझा याच मार्गावर अपघात झाल्यानंतर कित्येक महिने अपंगत्व व वेदना सहन कराव्या लागल्या. मी माझ्या बाजूने जात असतानाही एका दुचाकीस्वाराने पायाला धडक दिली होती. हा मार्ग मोठा असता व येणारा-जाणारा मार्ग वेगळा असता तर कदाचित या दुःखातून जाण्याची माझ्यावर वेळ आली नसती."
- विद्याताई गणेश मेहरे, नागरिक