गावठाणच्या जागेवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:56 PM2019-03-14T23:56:23+5:302019-03-14T23:57:19+5:30
येथील बसस्थानक परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमणाने परिसीमा गाठली असतानाच आता गावातील गांधी वॉर्ड व नदी काठावरील रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. यामुळे मलातपूर, गौरखेडा शिवारात जाणारा रस्ता अरुंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : येथील बसस्थानक परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमणाने परिसीमा गाठली असतानाच आता गावातील गांधी वॉर्ड व नदी काठावरील रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. यामुळे मलातपूर, गौरखेडा शिवारात जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. या अतिक्रमणाकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, महसूल विभाग व भूमापन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमणधारकांचे फावले आहे.
आपल्या घरासमोरील रस्ता व गावठाणची खाली जागा यावर आधी साध्या काड्या उभ्या करून त्यावर सावलीसाठी तुराट्या ठेवायच्या, नंतर हळूहळू लोखंडी खांब उभे केले. टिना टाकायच्या, काही साधने, पक्के बांधकाम करून आपला व्यवसाय उभा करायचा व कालांतराने ही जागा माझीच आहे, येथे २४ वर्षांपासून वास्तव्य असल्याने माझा हक्क आहे, अशी मानसिकता रोहण्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत असल्याने गावातील अनेक ठिकाणचे रस्ते पूर्वीच अरुंद झाले असताना आता गांधी वॉर्डातील आठवडी बाजार परिसरातील मलातपूर, गौरखेडा शिवारात जाणारा मोठा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. याच वॉर्डात एका खाली जागेवर एका व्यावसायिकाचा लाकडी ठेला आहे.
त्या ठेल्यातून व्यावसायिक आपला व्यवसाय करतो. पण, दोन वर्षापूर्वी या जागेवर जागा मालकाने पक्के घर बांधले. त्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर व्यावसायिकाचा ठेला आहे. त्यामुळे घरमालक शेतकऱ्यांची रहदारी प्रभावित झाली आहे. हा ठेला दरवाज्यासमोरून उचलावा म्हणून घरमालकाने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. लोकशाही दिनात शिवाय महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडेही तक्रार नोंदविली आहे. ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने वाद समाझोत्यातून मिटावा म्हणून प्रयत्न केला. पण, दोन वर्षांपासून तिढा सुटू न झकल्याने घरमालकाचे शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविणे सुरूच आहे.
अशा प्रकारे सुरूवातीला तात्पुरते व कालांतराने पक्के बांधकाम करून रस्त्यावर व गावठाणच्या जागेवर आपला हक्क सांगण्याच्या गावकरी व व्यावसायिकांच्या मानसिकतेमुळे रस्ते अरूंदच झाले नाही तर भांडणाचेही हे अतिक्रमण कारण ठरत आहे. तरी अतिक्रमण होता क्षणीच संबंधीत प्रशासनाने दखल घेतल्यास पुढील समया व वाद टाळता येतात एवढे मात्र खरे.