भंगार वाहनांचे वाहनतळावर अतिक्रमण
By admin | Published: July 17, 2017 02:10 AM2017-07-17T02:10:51+5:302017-07-17T02:10:51+5:30
वाहनांची पासिंग करणे, वाहन चालविण्याचा परवाना देणे, अनधिकृत वाहनांवर कारवाई करणे आदी जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
प्रशासकीय भवनातील आरटीओचा प्रकार : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनाही बगल
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाहनांची पासिंग करणे, वाहन चालविण्याचा परवाना देणे, अनधिकृत वाहनांवर कारवाई करणे आदी जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पार पाडते. यामुळेच या विभागाला पिपरी येथे मोठी जागा देण्यात आली आहे; पण या विभागाची सर्व कामे प्रशासकीय भवनातील कार्यालयातूनच होत आहे. परिणामी, या परिसरात भंगार वाहनांचा राबता वाढला आहे. आता तर भंगार वाहनांनी वाहनतळावरच अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत अनधिकृत वाहनांचे परवाने निलंबित करीत ते जप्त करण्याची कारवाई केली जाते. यात विविध वाहने जप्त केली जातात. जप्तीतील ही भंगार झालेली वाहने ठेवण्याकरिता या विभागाला मोठी जागा देण्यात आली आहे. ही जागा पिपरी (मेघे) येथे मुख्य मार्गावर आहे. या ठिकाणी एक-दोन वर्षांपूर्वी वाहन चालविण्याचे परवाने देण्याचे तसेच वाहन चालविता येते की नाही, हे तपासण्याचे काम केले जात होते; पण सध्या ही सर्व कामे प्रशासकीय भवन परिसरातील जागेतच होत असल्याचे दिसून येत आहे. वाहन चालकांची प्रात्याक्षिक परीक्षा पिपरी येथे घेतली जात असली तरी फारसे अधिकारी, कर्मचारी तेथे उपस्थित राहत असल्याचे दिसत नाही.
या विभागाद्वारे काही वर्षांपूर्वी जप्त करण्यात आलेली वाहने प्रशासकीय भवन परिसरात ठेवण्यात आलेली आहेत. ही वाहने भंगार झाली असून जागेवर हलविण्याकरिताही त्यांना अन्य वाहनांचा वापर करावा लागतो. या परिसरात जिल्हाधिकारी शैलैश नवाल यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली. यात ही भंगार वाहने अकारण जागा व्यापत असल्याचे दिसून आले. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारत ही वाहने पिपरी (मेघे) येथील जागेवर हलविण्याचे निर्देश दिले. यावरून ही वाहने त्या जागेवर हलविणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. आरटीओ कार्यालयाकडून ही वाहने प्रशासकीय भवन परिसरात हलविण्यात आले. काही वाहने कॅन्टीनच्या मागील भागात, काही स्वच्छतागृहाजवळ अर्जनविस बसतात तेथे ठेवली तर बहुतांश वाहने वाहनतळावर ठेवण्यात आली आहेत. कर्मचारी तथा नागरिकांसाठी असलेल्या वाहनतळाची जागा आता या भंगार वाहनांनी घेतली आहे. परिणामी, नागरिकांना वाहने ठेवण्याकरिता जागा शोधावी लागते. बहुतांश कर्मचारी इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे वाहने ठेवत असल्याने या परिसरात ये-जा करण्याकरिता जागा राहत नाही. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने याकडे लक्ष देत वाहन हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.