अतिक्रमण हटाव मोहिमेत बांधकाम विभाग मागेच

By admin | Published: June 3, 2015 02:17 AM2015-06-03T02:17:59+5:302015-06-03T02:17:59+5:30

शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी चौथ्या दिवशीही सुरूच होती. दरम्यान, दुपारी २ वाजता शिवाजी चौकात अतिक्रमणात असलेला पानठेला हटविण्यात आला.

The encroachment was removed from the construction department before the campaign | अतिक्रमण हटाव मोहिमेत बांधकाम विभाग मागेच

अतिक्रमण हटाव मोहिमेत बांधकाम विभाग मागेच

Next

आर्वीत तणावाची स्थिती : चौथ्या दिवशीही मोहीम सुरूच
आर्वी : शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी चौथ्या दिवशीही सुरूच होती. दरम्यान, दुपारी २ वाजता शिवाजी चौकात अतिक्रमणात असलेला पानठेला हटविण्यात आला. यावरून काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शहरात सुरू असलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मागेच असल्याचे दिसून येते.
गत चार दिवसांपासून शहरात पालिकेद्वारे सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभाग मागे आहे. या विभागाचा एकही अधिकारी अतिक्रमण मोहिमेत सहभागी झाला नाही. शहरात बांधकाम विभागाच्या जागेवरच सर्वाधिक अतिक्रमण आहे. ते हटविण्यासाठी पालिकेने मोहिमेत सहभागी होण्याचे लेखी पत्र बांधकाम विभागाला दिले होते; पण या मोहिमेत न.प. प्रशासनाला ‘एकला चलो रे’ ची भूमिका वठवावी लागत आहे.
पालिकेप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळेगाव ते पुलगाव रोड, बसस्थानक परिसर, शिवाजी चौक ते देऊरवाडा रोड, कन्या शाळा परिसर व शहरातील अन्य भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागासाठी पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले; पण सदर विभाग यात सहभागी झाला नाही. चार दिवसांपासून पालिका अतिक्रमण हटाव मोहीम राबवित आहे. याकडे बांधकाम विभागाचा एकही अभियंता फिरकला नाही. बांधकाम विभागाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला; पण बांधकाम विभागच बेपत्ता आहे. यामुळे सदर विभागाच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
शहरात सर्वत्र अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. यातच उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयानेही त्यांच्या कार्यालयासमोर कित्येक वर्षांपासून असलेली माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महादेव धुर्वे यांची खानावळ हटवावी, अशी मागणी केली आहे. या खानावळीमुळे शेतकऱ्यांना उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय शोधताना त्रास सहन करावा लागतो.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यास अतिक्रमण मोहिमेत सहभागी होण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसे त्यांना कळविले होते. पालिकेसोबत अतिक्रमणाबाबत आढावा व समन्वय साधने सुरू आहे.
- जे.वाय. जुमडे,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी.
बांधकाम विभागाच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढणे, ही त्यांची जबाबदारी आहे. त्याबाबत त्यांना लेखी कळविण्यात आले होते. पालिका प्रशासन त्यांच्या जागेवरचे अतिक्रमण काढत आहे.
- संजय राऊत,
बांधकाम सभापती, न.प. आर्वी.
वाहन दुरूस्तीच्या दुकानांमुळे त्रास
याच परिसरात वाहनांच्या दुरूस्तीचे लहान दुकान आहे. वाहनाचा कर्णकर्कश आवाज दिवसभर सुरू असतो. शिवाय गाड्यांची वर्दळ असते. यामुळे शासकीय कामकाज करताना अडथळा होत असल्याची लेखी तक्रार उपविभागीय कृषी अधिकारी अरूण बलसाणे यांनी न.प. मुख्याधिकारी टाकरखेडे यांच्याकडे सोमवारी प्रत्यक्ष भेटून केली.
यापूर्वी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस यंत्रणेकडे अनेकदा तक्रारी केल्या; पण कारवाई झाली नाही. सध्याच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत शासकीय कार्यालयासमोरील अतिक्रमण हटविण्याची मागणी लेखी तक्रारीतून करण्यात आली आहे.
किरकोळ दुकानदारांवर संक्रांत
शहरात चवथ्या दिवशीही पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात किरकोळ भाजी विक्रेते, फळविक्रेत्यांवर सक्रांत आली आहे. यामुळे भाजी बाजारात येणारी भाजीपाल्याची आवक मंदावली असून तुटवडा निर्माण झाल्याने भाव वधारले आहे. सोबतच किरकोळ दुकानदारांवरही संक्रांत आली आहे.

Web Title: The encroachment was removed from the construction department before the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.