आश्वासनाअंती बेमुदत उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:39 AM2018-11-18T00:39:35+5:302018-11-18T00:40:39+5:30
पुतळा अवमानना प्रकरणी २२ नोव्हेंबर पर्यंत दोषी कर्मचाऱ्यांसंदर्भात निर्णय देण्यात येईल असे लिखीत आश्वासनानंतर सहाव्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांच्या बेमुदत उपोषणाची सांगता झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : पुतळा अवमानना प्रकरणी २२ नोव्हेंबर पर्यंत दोषी कर्मचाऱ्यांसंदर्भात निर्णय देण्यात येईल असे लिखीत आश्वासनानंतर सहाव्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांच्या बेमुदत उपोषणाची सांगता झाली. परंतु विविध संघटना व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हिंगणघाट येथे आज पाणी टंचाईच्या बैठकीला आलेल्या जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे यांना घेराव घातल्यानंतर नाईलाजाने हे पत्र घ्यावे लागल्याने दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल काय याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
हिंगणघाट पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा क्षतीग्रसत पुतळा भंगार वस्तूंच्या यादीत टाकून त्याची ४० रुपये किंमत मान्य केली. या प्रकाराने जनमानसात संतप्त भावना निर्माण होऊन विविध संघटनांनी एकत्र येऊन धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी पाच दोषी कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित करून जि. प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे महिन्याभरापूर्वीच अहवाल सादर केला होता. परंतु, कारवाई शुन्य होती. अखेर १२ नोव्हेंबर पासून सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांनी दोषी कर्मचाºयांवर कारवाई करावी या मागणीसाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. उपोषणाच्या दरम्यानही प्रशासन थंडच होते. अखेर १४ नोव्हेंबरला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सहाय्यक अधिकाºयांच्या नावे पत्र काढून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देष दिले. या टोलवाटोलवीने जनभावना अधिकच संतप्त झाली. शनिवारी पाणी टंचाईच्या सभेकरिता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे हिंगणघाट पं.स.मध्ये आले असता त्यांना मराठा संघ, भीम आर्मी सेना, संभाजी ब्रिगेड, विदर्भ राज्य आघाडी, मनसे, रायुकॉ, प्रहार आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घेराव घातला. त्यानंतर बैठक घेवून हे लेखी आश्वासन देण्यात आले. वेळीच कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
आत्मदहनाचा इशारा
लेखी आश्वासन मिळताच बेमुदत उपोषणाची सांगता राजू तिमांडे, अतुल वांदिले, गजू कुबडे, अनिल जवादे, अनिल भोंगाडे, भूषण पिसे, नगरसेवक सौरभ तिमांडे व धनंजय बकाने, सुरेंद्र डोंगरे, उमेश नेवारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. २२ नोव्हेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास २३ नोव्हेंबरला आत्मदहनाचा इशारा दिला आहे.