वर्ध्यात वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता भावंडानी कसली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 03:23 PM2020-04-28T15:23:15+5:302020-04-28T15:24:44+5:30

बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरत खरबुजाची (डांगर) शेती पिकविली आहे.

Engineer siblings work hard to pay off their father's debt in Wardha | वर्ध्यात वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता भावंडानी कसली शेती

वर्ध्यात वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता भावंडानी कसली शेती

googlenewsNext
ठळक मुद्देखरबुजाच्या पिकाने जीवनातही आला गोडवाशेतीतील प्रयोग इतरांसाठी ठरतेय प्रेरणादायी

 
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: शेतकरी पित्याने दोन्ही मुलांना चांगले संस्कार देत शिक्षणासाठी शेतात रक्त आटवले. मुलांना उच्चशिक्षण घेता यावे, याकरिता कर्ज काढून वेळोवेळी प्रोत्साहन दिले. पित्याची ही धडपड पाहून मुलांनीही अभियांत्रिकेची पदवी मिळविली. त्यानंतर नोकरीकरिता प्रयत्न केले पण, नोकरी मिळाली नाही. दोन्ही भावंडांना वडिलांवरील कजार्ची नेहमीच चिंता असायची. म्हणून बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरत खरबुजाची (डांगर) शेती पिकविली आहे.
रजत पुरुषोत्तम उईके व शुभम पुरुषोत्तम उईके, असे या कर्तबगार भावंडाचे नाव आहे. त्यांचे वडील पुरुषोत्तम धोंडुजी उईके हे हिंगणघाट तालुक्याच्या जांगोना या गावातील रहिवासी आहे. त्यांच्याकडे दहा एकर शेती असून त्यातील पाच एकरामध्ये ओलीताची सोय आहे. या दहा एकराच्या भरोवशावरच पुरुषोत्तम उईके यांनी पाच सदस्यांच्या कुटुंबाचा सांभाळ केला. शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी रजत आणि शुभमला शिकविले. त्यांच्या शिक्षणात कुठेही खंड न पडू देता वेळोवेळी कजार्ची उचल करुन दोघांना अभियंता बनविले. थोरला रजत हा सिव्हिल इंजिनिअर तर धाकटा शुभम हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला. आता नोकरीकरुन वडिलांना आधार देण्यासाठी इतर युवकांप्रमाणेच यांनीही मोठ्या शहराकडे धाव घेतली. पण, बेरोजगारीच्या या वावटळीत त्यांचाही निभाव लागला नाही. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्यासाठी तडख आपले गाव गाठून आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. गावात आल्यानंतर घरच्यांना हा निर्णय सांगून दुसºया दिवशीपासून शेतात राबायला सुरुवात केली. जे पीक गावातील इतर शेतकरी घेत नाही व आतापर्यंत घेतलेले नाही ते पीक घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले. अडीच एकरात खरबुजाची लागवड करीत त्यातून आता एका दिवसाआड ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न घेत आहे. या भावंडांच्या या प्रयत्नाला यश आल्याने जीवनातही गोडवा निर्माण झाला आहे.

शेतातील झोपडीत ठोकला मुक्काम
रजत आणि शुभम या मुलांची शेतीत साथ मिळाल्याने वडिलांनाही मोठा आधार मिळाला आहे. त्यांनी खरबुजाची लागवड केल्यापासूनच शेतातच झोपडी टाकून तेथे मुक्काम सुरु केला आहे. आता जैविक खरबुजाचे पिक चांगलेच बहरल्याने या भावंडाची मेहनत फळाला आली आहे. अडीच एकारातून एक दिवसाआड दीड टन खरबूज निघत असून ते बाजारभावानुसार सरासरी ४० ते ४५ हजार रुपयांप्रमाणे विकले जात आहे. खर्चवजा जाता त्यांना ३५ हजार रुपये मिळत आहे. या पिकातून त्यांना २० ते २२ टन उत्पादनाचा अंदाज असून यातून खर्चवजा जात ५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

लॉकडाऊनमध्ये होम डिलेव्हरी
कोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने भाजीपाला व फळे विकण्यारिता उत्पादकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. रजत व शुभमलाही खरबूज विकण्यासाठी अडचणी जात आहे. मात्र, त्यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करीत कल्पकतेच्या सहाय्याने ह्यहोम डिलेव्हरीह्ण हा पर्याय शोधून काढला. खरबुजाची व्यवस्थित पॅकींग करुन ते घरोघरी पोहोचविले जात आहे. यासोबतच त्यांनी वध्यार्तील मगनसंग्रहालयासमोर कारमध्येच दुकान थाटून विक्री चालविली आहे

बेरोजगारीची समस्या असल्याने नोकरी मिळणे सहज शक्य नाही. अशातच नोकरीच्या प्रतिक्षेत वेळ घालविण्यात काही अर्थ नसल्याने आम्ही दोन्ही भावंडांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. खरबुजाची लागवड करुन एका दिवसाआड ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यातून वडीलांनी आमच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज आम्ही फेडणार आहे.
- रजत पुरुषोत्तम उईके, युवा शेतकरी.

Web Title: Engineer siblings work hard to pay off their father's debt in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती