मत्स्यशेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:47 PM2017-12-29T23:47:29+5:302017-12-29T23:48:11+5:30
तलाव तेथे मासोळी अभियानात यावर्षी जिल्ह्यातील मत्स्यसंवर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पिढीतील या मत्स्यसंवर्धकांनी मत्स्यशेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करुन इतरांनाही मत्स्यशेती करण्यासाठी पे्ररणा मिळेल अशा पद्धतीने मत्स्यशेतीचे रोल मॉडेल करावे,
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तलाव तेथे मासोळी अभियानात यावर्षी जिल्ह्यातील मत्स्यसंवर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पिढीतील या मत्स्यसंवर्धकांनी मत्स्यशेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करुन इतरांनाही मत्स्यशेती करण्यासाठी पे्ररणा मिळेल अशा पद्धतीने मत्स्यशेतीचे रोल मॉडेल करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त सुनील वंजारी यांनी केले.
हैद्राबाद राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड पुरस्कृत कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीवर तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, मत्स्य महाविद्यालयाचे अरविंद कुळकर्णी, जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष कमलेश मारबडे, सहाय्यक आयुक्त शा.बा. डोंगरे यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असताना शेतकºयांनी मत्स्यशेती केली. यातुन त्यांना नक्कीच चांगला अनुभव मिळेल. शेतकºयांनी या माध्यमातुन आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन वंजारी यांनी केले.
रोजच्या आहारात प्रथिनांची आवश्यकता असते. दक्षिणेकडील राज्यांमध्ये आहारातील प्रथिनांची गरज मासळी पूर्ण करते. मात्र महाराष्ट्रात त्यातही पश्चिम विदर्भात मासळी खाण्याचे प्रमाण कमी आहे. कारण त्यांची उपलब्धता कमी प्रमाणात नाही. यासाठी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या पुढाकारातुन तलाव तेथे मासोळी अभियान सुरू करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातही मत्स्यसंवर्धक तयार होत असून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मासळीची गरज पूर्ण होईल. मत्स्यसंवर्धकांचेही आर्थिक सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन मनीषा सावळे यांनी केले. कमलेश मारबडे यांनी मत्स्यसंवर्धकांनी उत्पादित मासळीला योग्य मोबदला देण्याची मागणी केली. अरविंद कुळकर्णी यांनी गोड्या पाण्यातील माशांच्या संवर्धनासाठी जागेची निवड, माशांच्या जातीची ओळख, तलावाचे बांधकाम याबाबत मार्गदर्शन केले. जितेश केशव यांनी मत्स्यबीज संचयनानंतरचे व्यवस्थापन सांगितले.