शिक्षणोत्सवात बालकांचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:00 AM2021-10-05T05:00:00+5:302021-10-05T05:00:16+5:30
कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शिक्षकांकडून शाळेत आलेल्या बालकांचे तापमान मोजून आत प्रवेश दिला. त्यासोबत वर्गामध्ये एका बाकावर एक याप्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली. सामाजिक अंतरासोबतच नियमित हात धुणे, तोंडावर मास्क आणि सोबत पाण्याची बॉटल आणण्याच्याही सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांनुसार पहिल्या दिवशी बालके शाळेमध्ये उपस्थित झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : साधारणत: दीड वर्षानंतर शाळांची घंटा वाजली असून, आता ऑनलाइन शिक्षणाला ब्रेक लागून ऑफलाइन शिक्षण सुरू होणार आहे. आज पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंत तब्बल ६२७ शाळा सुरू झाल्या. या शिक्षणोत्सवामध्ये बालकांचा मोठा उत्साह दिसून आला. शाळांमध्ये शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले, तसेच कोरोनाच्या नियमावलीचेही काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी घरातच कोंडून असल्याने त्यांना शाळेत रमता आले नाही. शाळेतील शिक्षक आणि मित्र-मैत्रिणी यांच्यापासूनही विद्यार्थी बरेच दूर गेले आहे; पण आता शाळांचा पहिला ठोका पडला आणि नवचैतन्याचे कोंब पुन्हा शाळेमध्ये उड्या मारू लागले. पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये किलबिलाट सुरू केला.
कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शिक्षकांकडून शाळेत आलेल्या बालकांचे तापमान मोजून आत प्रवेश दिला. त्यासोबत वर्गामध्ये एका बाकावर एक याप्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली. सामाजिक अंतरासोबतच नियमित हात धुणे, तोंडावर मास्क आणि सोबत पाण्याची बॉटल आणण्याच्याही सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांनुसार पहिल्या दिवशी बालके शाळेमध्ये उपस्थित झाली. जिल्ह्यामध्ये पाचवी ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अशा एकूण ३७७ शाळा पहिल्या दिवशी सुरू करण्यात आल्या. सोबतच नववी ते बारावीपर्यंत २५० अशा एकूण ६२७ शाळा सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पहिल्या दिवशी शिक्षण विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांसह उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी शाळांना भेटी देऊन उपस्थितीचा आढावा घेतला.
पालकांना आग्रह करा, सक्ती नाही
कोरोना संकट अजूनही कायम असून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये रुळविण्यासाठी चांगली दमछाक होणार आहे. दररोज शाळेत विद्यार्थ्यांचा तापही मोजावा लागणार असल्याने अध्यापनासोबतच डॉक्टरांचीही भूमिका निभवावी लागेल. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात पालकांना आग्रह करावा पण, सक्ती करू नये असेही निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे पालकांनीच आता पाल्यासंदर्भात योग्य निर्णय घ्यायचा आहे.
गुणवंतांचा सन्मान, बालकांचे स्वागत
पहिल्या दिवशी विद्यार्थीही शाळेच्या गणवेशामध्ये उपस्थित झाले होते. सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच या बालकांना चॉकलेट देऊन त्यांचे तोंडही गोड करण्यात आले. शाळेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. वर्धा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, सेलू (काटे) येथील प्राची जगदीश येंडे ही विद्यार्थिनी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी पं. स. सभापती महेश आगे, विस्तार अधिकारी सुरेश हजारे, केंद्र प्रमुख वसंत खोडे, प्राचीचे आई-वडील आणि शिक्षकांची उपस्थिती होती.
शाळा बंद, पण शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य
- ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या तर, शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा अद्यापही बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. पण, शाळा बंद आणि ऑनलाइन शिक्षण सुरू असताना या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची शाळांमध्ये शतप्रतिशत उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
- आता वर्ग जरी बंद असले तरीही या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे.
या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्या !
- राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे आजपासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे आता वर्ग सुरू होऊन त्यांचे ऑफलाइन शिक्षण सुरू होणार आहे.
- परंतु ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात कोणतेही निर्देश नसल्याने या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे. आवश्यकतेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन मार्गदर्शन करावे असे निर्देश देण्यात आलेत.